मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी लेटर बॉम्ब टाकून राज्याच्या राजकारणामध्ये एकच खळबळ उडवून दिली. त्यानंतर त्यांनी सुप्रीम कोर्टात सुद्धा धाव घेतली. परमबीर सिंगी यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आजच सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या याचिकेकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. यावरून आता महाविकास आघाडी सरकार कमालीचे अडचणीत आले आहे.
पोलीस दलातील बदल्या आणि पदोन्नतीसंदर्भातील रॅकेटचा २५ ऑगस्ट २०२० रोजीच अहवाल दिलेला असताना दोषींवर कारवाई न करता हा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांनाच बाजूला करण्यात आले, असा आरोप करत यासंबंधीचा तत्कालीन गुप्तवार्ता प्रमुख, पोलीस महासंचालक आणि गृहविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्यातील कथित पत्रव्यवहार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उघड केला. एकूणच या सगळ्या प्रकरणात देवेंद्र फडणवीस कमालीचे आक्रमक झालेले दिसत आहेत. यावरून आता राष्ट्रवादीचे नेते अनिल गोटे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
मंगळवारी फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन पोलीस बदल्यांच्या रॅकेटचा खळबळजनक आरोप केल्यानंतर आता अनिल गोटेंकडून खरमरीत शब्दांमध्ये परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. यामध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. “भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणांचं समर्थन करून जनतेच्या रोषाला तोंड देण्याची त्यांच्यात हिंमत नाही. त्यामुळे आपल्या डरपोकपणावर शिक्कामोर्तब होऊ नये, म्हणून त्यांचे आकांडतांडव सुरू आहे. पोलीस यंत्रणेचा वापर करून विरोधकांनाच नव्हे, तर मासबेस असलेल्या ओबीसी नेत्यांना संपवण्यासाठी फडणवीसांनी पोलीस यंत्रणेला कसं वेठीला धरलं, अशा असंख्य प्रकरणांची माझ्याकडे जथ्थी आहे”, असं गोटेंनी या पत्रकात म्हटलं आहे.
अनिल गोटेंनी यावेळी कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. “देवेंद्र फडणवीसांना मी स्वत: कुठल्या मंत्र्यांनी कुठल्या आयुक्तांच्या मदतीने पैसे गोळा केले, किती नंबरच्या गाडीतून पैसे कुठे आले, कुणाकडे उतरवले याची विस्तृत माहिती दिली. सदर मंत्र्यांवर कारवाई करण्याऐवजी फडणवीसांनी त्यांना क्लीनचिट दिली”, असं गोटे म्हणाले आहेत. “फडणवीसांना भ्रष्टाचारावर बोलण्याचा तुम्हाला काहीएक अधिकार नाही. ती नैतिकताच तुम्ही केव्हाच गमावली आहे. उगाच नाक वर करून आणि लांब जीभ काढून तुम्ही केलेल्या आक्रस्ताळेपणावर कुणी काडीचा सुद्धा विश्वास ठेवत नाही”, असं देखील या पत्रकात पुढे म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार ? मुख्यमंत्री आज मोठा निर्णय घेण्याची शक्यता
- ‘अस्तनीतील हे निखारे राज्य सरकारने पदरी बाळगले होते’
- प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल-भुवी बद्दल वीरूचे भन्नाट ट्विट व्हायरल
- ‘विरोधी पक्षाने सरकार खिळखिळे करण्यासाठी या अधिकाऱ्यांशी संगनमत केले’
- धवन-रोहित जोडीने मोडला सचिन-सेहवागचा रेकॉर्ड


