मुंबई : शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्त आज रायगडावर खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन केले. यावेळी अनेक शिवभक्त रायगडावर हजर होते. या कार्यक्रमानंतर शिवभक्तांशी संवाद साधताना छत्रपती संभाजीराजे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चांगलेच संतापलेले पाहायला मिळाले.
यावेळी खासदार संभाजी छत्रपती यांनी अखेर रायगडावरून मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाची घोषणा केली आहे. येत्या 16 जून रोजी मराठा आरक्षणासाठी पहिला मोर्चा काढण्यात येणार आहे. कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळावरून हा मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा संभाजी छत्रपती यांनी केली आहे. या आंदोलनाला भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी अप्रत्यक्ष पाठिंबा दिला आहे. तर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी मात्र त्यावर सवाल केला आहे. आंदोलन कुणाच्या विरोधात आहे? सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात आहे का?; असा सवाल अरविंद सावंत यांनी केला आहे. शिवसेनेच्या बड्या नेत्याने पहिल्यांदाच थेट संभाजीराजेंनाच सवाल केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
संभाजी छत्रपती यांनी आज किल्ले रायगडावरून येत्या 16 जून रोजी मराठा आरक्षणासाठी आंदोलन करण्याची हाक दिली. त्यावर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. छत्रपती संभाजीराजे भाजपचे खासदार आहेत. कोणाविरुद्ध लढतो? कशासाठी लढतोय? हे त्यांनी ठरवलं पाहिजे. सरकार तुमच्याबरोबर आहे. न्यायिक लढाई लढण्यासाठी सरकार पूर्णपणे तयार आहे. कोणीतरी काढा दिल्यानंतर तुमचा आवाज विरोधात दिसत आहे, असा टोला सावंत यांनी लगावला आहे.
तसेच यावेळी ते बोलताना म्हणाले कि, ‘संभाजीराजेंचा आम्ही आदर करतो. भाजपचा या आंदोलनाला छुपा पाठिंबा असू शकतो. राज्य सरकार आरक्षणाच्या बाजूने आहे. त्यामुळे हे आंदोलन केंद्र सरकार, सर्वोच्च न्यायालय की सरकार विरोधात आहे का? हे संभाजीराजेंनी स्पष्ट केलं पाहिजे,’ असे देखील ते यावेळी म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- नारायण राणेंनी संभाजीराजेंचा आदर्श घेतला पाहिजे ; राऊतांचा टोला
- ‘सोयाबीन बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध करा’, शिवसेना खासदाराचे ‘महाबीज’ला पत्र
- ६२ दिवसांनंतर जालना जिल्हा उद्यापासून होणार अनलॉक
- विनायक मेटेंच्या पुढील सर्व आंदोलनात भाजप सहभागी होणार-आशिष शेलार
- शनिवारी फक्त दिव्यांगांनाच लस; बीडचा ‘स्पेशल डे’ पॅटर्न राज्यात राबवणार-धनंजय मुंडे


