मुंबई: राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना “तुम्ही राजकारणात कशासाठी राहता, घरी जा आणि स्वयंपाक करा.”, असा खोचक सल्ला दिल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil ) यांच्यावर सर्वच स्तरातून टीका केली जात आहे. यावरच आता राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनीही प्रतिक्रिया देत टोला लगावला आहे.
“गृहिणींचा अभिमान असावा, पण भाजप नेत्यांकडून महिलांचा नेहमीच द्वेष केला जातो आणि चंद्रकांत पाटील दादांचं वक्तव्यही याच द्वेषातून आलेलं आहे. म्हणूनच राजकारणी व यशस्वी गृहिणी असलेल्या सुप्रियाताईंबद्दल त्यांचा राग असावा. पण गृहिणी होणं हे कोल्हापूर सोडून पुण्याला येण्याइतकं सोपं नसतं!”, असा टोला रोहीत पवार यांनी ट्वीट करत लगावला आहे.
गृहिणींचा अभिमान असावा, पण
भाजप नेत्यांकडून महिलांचा नेहमीच द्वेष केला जातो आणि @ChDadaPatil दादांचं वक्तव्यही याच द्वेषातून आलेलं आहे.. म्हणूनच राजकारणी व यशस्वी गृहिणी असलेल्या सुप्रियाताईंबद्दल त्यांचा राग असावा!
पण गृहिणी होणं हे कोल्हापूर सोडून पुण्याला येण्याइतकं सोपं नसतं!— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 26, 2022
चंद्रकांत पाटलांचे स्पष्टीकरण :
“माझ्या वक्तव्याचा जो पराचा कावळा केला गेला, त्यावर सुप्रियाताईंनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. मी कधीही कोणत्याही स्त्रीचा अनादर केलेला नाही. सुप्रिया सुळेच नाही तर कोणत्याही महिलेला आदर देण्याचा माझा स्वभाव आहे. पोरालाही आई मसणात जा असं म्हणते. याचा अर्थ त्याला स्मशानभूमीत जा असा नाही होत. काही जमत नसेल तर सोड बघू असं म्हणण्याची पद्धत आहे. त्यामुळे सुप्रिया सुळेंबद्दल अनादर नाही. आम्ही जेव्हा भेटतो तेव्हा आदराने एकमेकांची चौकशी करतो.”, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
नेमके काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
“तुम्ही राजकारणात कशासाठी राहता, घरी जा आणि स्वयंपाक करा. तुम्ही खासदार आहात ना. एका मुख्यमंत्र्यांची भेट कशी घ्यायची हे तुम्हाला कळत नाही. तुम्ही दिल्लीत जा नाहीतर मसणात जा. शोध घ्या आणि आरक्षण द्या.”, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
सुप्रिया सुळे काय म्हणाल्या होत्या?
देशात मध्य प्रदेश सरकारने ओबीसी आरक्षण दिल्याने महाराष्ट्राच्याही आशा पल्लवित झाल्या आहेत. यासंदर्भातच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री दिल्लीला गेले आणि दिल्लीत बैठक झाली. त्यांना न्याय मिळाला आणि आपल्यावर अन्याय झाला. याचं उत्तर मी केंद्र सरकारला विचारणार असल्याचे म्हटले. तर यावरच प्रतिक्रिया देताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची जीभ घसरली आणि त्यांनी सुप्रिया सुळे यांना खोचक सल्ला दिला.
महत्त्वाच्या बातम्या –

