🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या विरोधात बंड केलेले शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे केवळ आमदारच नाही तर शिवसेनेच्या कोट्यातील जवळपास सर्वच मंत्रीही आहेत. उद्धव ठाकरेंना रोजच धक्का बसतोय. काल (रविवार) महाराष्ट्राचे आणखी एक मंत्री उदय सामंतही गुवाहाटी येथे पोहोचले असून ते आमदारांच्या असंतुष्ट छावणीत सामील झाले आहेत. सामंत आज गुजरातमधील सुरतहून गुवाहाटी येथे पोहोचले आहेत. यानंतर आता शिंदे गटात शिवसेनेचे 39 तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे 16 आमदार आहेत. दुसरीकडे मंत्र्यांचा विचार केला तर 9 मंत्री शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत फक्त आदित्य ठाकरे उरले आहेत. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी बंडखोर नेत्यांची मंत्रीपद काढून घेण्याचा महत्वाच्या निर्णय घेतला आहे.
जनहिताची कामे अडकून न राहता ती अविरतपणे सुरू राहण्यासाठी तसेच सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यात अतिवृष्टी होणे, आपत्तीच्या घटना, अशा परिस्थितीत विभागांची कामे सुरळीतपणे पार पाडण्यासाठी अनुपस्थित पाच मंत्री आणि चार राज्यमंत्री यांच्याकडील खाती इतर मंत्र्यांना सोपविण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. यामध्ये आदित्य ठाकरे यांना झुकते माप दिल्याची चर्चा आहे. उदय सामंत यांच्याकडील उच्च व तंत्र शिक्षण खाते आदित्य ठाकरे यांच्याकडे देण्यात आले आहे. त्यामुळे आधीपासूनच पर्यटन आणि पर्यावरण, राजशिष्टाचार मंत्रालयाचा कारभार संभाळणाऱ्या आदित्य ठाकरेंना अधिक एक खातं देण्यात आलं आहे.
मुख्यमंत्री अगोदरच बडवे आणि घरातील लोकांमुळे अडचणीत आल्याचे बोलले जात आहे. त्यातच आदित्य ठाकरे यांना आणखी एक मंत्री पद देऊन असंतोष वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आदित्य ठाकरेंवर अतीविश्वास दाखवून जुन्या शिवसैनिकांना बाजूला केलं जात असल्याचा आरोप बंडखोर आमदार करत आहेत. त्यामुळे याचा फटका शिवसेनेला बसेल का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
मंत्र्याकडील खातेवाटपात बदल –
एकनाथ शिंदे यांच्याकडील नगर विकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) खाती सुभाष देसाई यांच्याकडे, गुलाबराव रघुनाथ पाटील यांच्याकडील पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग हे खाते अनिल दत्तात्रय परब यांच्याकडे, दादाजी दगडू भुसे यांच्याकडील कृषि व माजी सैनिक कल्याण खाते तसेच संदिपान आसाराम भुमरे यांच्याकडील रोजगार हमी, फलोत्पादन खाते शंकर यशवंतराव गडाख यांच्याकडे, उदय सामंत यांच्याकडील उच्च व तंत्र शिक्षण खाते आदित्य ठाकरे यांच्याकडे देण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
