मुंबई : राज्यातील अनेक एसटी आगारांत कर्मचाऱ्यांच्या कोरोना चाचणी अहवालापूर्वीच कामावर जाण्याची बळजबरी करण्यात येत आहे. अशा आगार व्यवस्थापकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसने केली आहे. आतापर्यंत राज्य परिवहन मंडळाचे जवळपास ७,५०० कर्मचारी कोरोनाबाधित झालेत. तर १८० हून अधिक कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला.
मार्चमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यातील चंद्रपूर, बुलडाणा, लातूर व अन्य काही आगारामध्ये एसटीची सेवा स्थगित करण्यात आली होती. वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यभरात लॉकडाऊनसदृश स्थितीतही सध्या केवळ अत्यावश्यक सेवांसाठी एसटी धावत आहे. मात्र याचदरम्यान एसटी प्रशासनातील जवळपास साडेसात हजार कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झालेली आहे. तर त्यापैकी जवळपास १८० हून अधिक कर्मचाऱ्यांचे निधन झाले आहे.
एसटी प्रशासनाने मात्र याबाबत गांभीर्याने कोणतेही पाऊल उचललेले नाही. त्यामुळे महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस संघटनेने संताप व्यक्त केलाय. एसटीमध्ये दिवसाला २०० कर्मचारी कोरोनाबाधित होत असून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाहीत. अल्प वाहतूक सुरू असताना व कोरोनाची चाचणी केल्याचे सांगूनही चालकांना हजेरीसाठी आगारात सक्तीने बोलवण्याचे भ्याड काम काही आगारांत अजूनही सुरू आहे.
टेस्ट झाल्याचे सांगूनही रिपोर्ट येण्याआधी कामगिरीवर जाण्याची बळजबरी काही आगारांत केली जाते. एवढ्या मोठ्या प्रमाणात जीव गेल्यानंतर आता परिपत्रक काढून समन्वय कक्ष नेमणे, हे उशिरा सुचलेले शहाणपण असून काही निर्दयी आगार व्यवस्थापकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे अशी मागणी होतेय.
महत्वाच्या बातम्या
- ‘महात्मा फुले योजनेतंर्गत मोफत कोरोना उपचार देणे ही राज्याची जबाबदारी’, हायकोर्टाचे आदेश
- ‘बारामतीकरांकडून उजनीचे पाणी चोरण्याचा घाट’, खा.निंबाळकरांचा आरोप
- चक्क पोलीस अधिक्षकांच्या नावाने बनावट फेसबुक खाते, मेसेजमधून मागितले पैसे!
- गैरप्रकार रोखण्यासाठी कोरोना रिपोर्टवर यापुढे ‘क्यूआर कोड’


