🕒 1 min read
मुंबई – राज्यात करोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी आणि रुग्णासंख्या नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केलेले आहेत. त्यामुळे अत्यावश्यक सेवा आणि जीवनावश्यक वस्तुंची दुकानं वगळता सर्व व्यवहारांना खिळ बसली आहे. हॉटेल व्यवसाय आणि बार यांनाही याची झळ बसली असून, या संदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवलं.
एफएल-3 परवानाधारक हॉटेल-परमीट बार मालकांना अबकारी कराचा भरणा किमान चार हप्त्यांमध्ये करण्याची सवलत द्यावी. वीज बिलात सवलत मिळावी तसेच मालमत्ता करात सूट मिळावी आणि केंद्रीय अर्थ मंत्रालयाने आपत्कालीन पतरेखा हमी योजना क्र. 1.0 व 2.0 अमलात आणून सदर योजनेला दिनांक 30 जून 2021 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. तसेच पर्यटन-आदरातिथ्य व्यवसायांकरिता क्र. 3.0 योजना जाहीर केली आहे. महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्यातदेखील उद्योग-व्यवसायाला संजीवनी देणारी, रोजगाराला प्रोत्साहन देणारी योजना राबवावी, असे शरद पवार यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.
पवारांच्या या पत्रावरून आता भाजपने पवार यांच्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांना लिहीलेल्या पत्रावरुन आचार्य तुषार भोसलेंचा शरद पवारांवर घणाघात केला आहे.या सरकारला मंदिरांपेक्षा मदिरा आणि बारचालकांवर प्रेम का हे कळाले कारण या सरकारचे निर्माते असलेले पवार साहेबच बार धार्जिणे आहेत असे त्यांनी म्हटले आहे.
पवार साहेबांना हातावर पोट असलेले मजूर, लोककलावंतांची उपासमार, हाल-फुल विक्रेते, शेतकरी, मराठा आरक्षण हे काहीच दिसले नाही. एकीकडे मठ-मंदिरांची विजतोडणी करायची आणि बारचालकांना वीजबील सवलत द्यायची हे चित्र आम्ही सहन करणार नाहीत. तुम्हाला हफ्ते मिळतात म्हणुन बारचालकांसाठी वेगळे धोरण आखायचं आणि हातावर पोट असलेल्यांना कोणतीही सवलत द्यायची नाही, हे आम्हाला मान्य नाही असे ते म्हणाले.
दरम्यान, भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी देखील पवारांच्या पत्रावरून तोफ डागली आहे. शरद पवार साहेबांनी बारमालकांना वीज बिलात सवलत द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. याच कळकळीने आपण शेतकऱ्यांसाठीही एखादे पत्र पाठवाल अशी अपेक्षा आहे. १०० कोटींच्या बोजाने दबलेल्या बार मालकांबाबत आपली कळकळ पाहून माझा कंठ दाटून आला आहे, हे मी नमूद करू इच्छितो, अशी टीका आ.अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विटमधून केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- दवाखाने फुल्ल, बेड मिळेनात, औषधांचाही तुटवडा… ‘या’ तालुक्यात रविवारपासून जनता कर्फ्यू
- सोलापूर शहराला वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी निधी देणार; भरणेंचे आश्वासन
- “शरद पवारांची बार मालकांबाबत कळकळ पाहून माझा कंठ दाटून आला”
- ‘तेव्हा शास्त्री यांनी किती रेड वाईन घेतल्या असतील याचा मी विचारही करू शकत नाही’
- प्रीती झिंटासोबत पंजाबचा शाहरुख खानने शेअर केलेल्या फोटोला दिले ‘हे’ कॅप्शन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
