🕒 1 min read
मुंबई : शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्यासह इतर आमदारांनी बंड पुकारल्याने महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर शिंदे-भाजप सरकार महाराष्ट्रात स्थापन झाले. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र यानंतर एकनाथ शिंदे गट आणि भाजप वारंवार हे सरकार शिवसेना-भाजप युतीचे असल्याचे ठणकावून सांगत आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झालेल्या धुळे जिल्ह्यातील साक्री विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मंजुळा गावित या आज धुळे शहरात दाखल झाल्या. यावेळी त्यांचे कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात आले. त्या त्यांच्या धुळे शहरातील निवासस्थानी दाखल होताच या ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाल्यानंतर प्रथमच धुळे शहरात आल्यानंतर मंजुळा गावी त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना मंजुळा गावित म्हणाल्या की, ‘अपक्षांनी नेमकं कोणत्या बाजूला असावं याबाबत आमच्यामध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र जिकडे सरकारचा कल असेल त्या बाजूला अपक्षांनी गेलं पाहिजे तसेच मतदारसंघाच्या विकासासाठी आम्ही एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलो. मतदार संघाच्या विकासासाठी निधी मिळण्यास आम्हाला कोणतीही अडचण येत नव्हती. कारण एकनाथ शिंदे कायम आमच्या सोबत होते तसेच ते आमच्याशी वेळोवेळी संपर्क साधत होते. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस या पक्षांच्या मंत्र्यांनी देखील आम्हाला मतदारसंघाचे विकासासाठी निधी दिला होता. अशी प्रतिक्रिया यावेळी मंजुळा गावित यांनी व्यक्त केली.
शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार आहे. अश्यातच शिंदे गटातील अपक्ष आमदारांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या अपक्ष आमदारांमध्ये बच्चु कडू आणि आशीष जैस्वाल यांचाही समावेश आहे. एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळासाठी आपण मंत्री पदाची अपेक्षा केली असून मंत्रीपद मिळाल्यास ते आनंदाने स्वीकारू अशी ही प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.
यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉक्टर तुळशीराम गावित यांनी देखील प्रतिक्रिया व्यक्त केली. ‘पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा मागितल्यास तो आपण देण्यास तयार आहोत. तसेच पक्षप्रमुखांनी ही जबाबदारी कायम ठेवण्यास सांगितल्यास ती देखील आपण आनंदाने स्वीकारू, शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन यापुढे देखील आपण काम करत राहण्याचा निश्चय डॉक्टर तुळशीराम गावित यांनी यावेळी व्यक्त केला.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
