🕒 1 min read
मुंबई: शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी सेनेशी बंड केल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार संकटात सापडली आहे. त्यातच या आमदारांनी मविआचा पाठींबा काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) तसेच सेनेचे अनेक नेते या बंडखोर आमदारांना समेटाची हाक देत आहेत. आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आजच्या सामना अग्रलेखातून या बंडखोर आमदारांची तुलना थेट पाकिस्तानशी केली आहे.
आमदारांच्या गटास महाशक्तीचा अजगरी विळखा पडला-
विधानसभेचे उपाध्यक्ष झिरवळ यांनी झाडीत बसलेल्या आमदारांच्या अपात्रतेबाबत कोणताही निर्णय घेऊ नये असे सर्वोच्च न्यायालय म्हणते. म्हणजे विधानसभेचे अधिवेशन ११ जुलैनंतरच घेता येईल. तोपर्यंत आमदारांना ‘डोंगर-झाडी-हाटील’मध्येच राहावे लागेल. या सगळ्या परिस्थितीत भाजपा नक्की कोठे आहे? भाजपा म्हटलं तर सर्वत्रच आहे, पण कुठेच नाही! त्यांचे काम नारदमुनीप्रमाणे चालते. भाजपा आपल्या मित्रांचा, सहकारी पक्षांचा ‘घास’ गिळूनच शांत होतो हे आता झाडीतल्या आमदारांना व नेत्यांना लवकरच कळेल. या आमदारांच्या गटास महाशक्तीचा अजगरी विळखा पडला आहे. हा अजगर अख्खा बोकड गिळावा तसे या गटास गिळून पुढे जाईल. असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची आस धरून बसले असतील तर…
११ जुलैपर्यंत या झाडी-झुडुपांतील आमदारांना गुवाहाटीतच राहावे लागेल व उद्या महाराष्ट्रात केंद्रीय सुरक्षा घेऊन परतले तरी उंदरांप्रमाणे बिळातच लपून राहावे लागेल, अशा प्रकारची चीड व संताप महाराष्ट्रीय लोकांत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे या परिस्थितीत मुख्यमंत्रीपदाची आस धरून बसले असतील तर त्यांना आधी महाराष्ट्रात धुमसणाऱ्या आगीशी सामना करावा लागेल. देवेंद्र फडणवीस यांची ही कृती त्यांच्यावरच उलटेल व भाजपाचा टांगा महाराष्ट्रात पलटेल हे आजचे वातावरण असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.
‘त्या’ डबक्यातून बाहेर पडावे व महाराष्ट्राच्या स्वर्गात यावे-
राज्यसभा, विधान परिषदा गद्दारांच्या मदतीने जिंकल्या, पण शेवटी लोकभावना तीव्र आहेत. शिवसेनेतून जे फुटले ते टिकले नाहीत. भुजबळांना शरद पवारांनी व राणेंना भाजपाने आधार दिला नसता तर त्यांचे काय उरले असते? स्वतःचे सत्त्व आणि अस्तित्वच हे लोक गमावून बसले. भारत तोडून बॅ. जीनाने पाकिस्तान निर्माण केला, पण तो देश राहिला नसून पृथ्वीवरचे एक डबकेच बनला आहे. तशीच अवस्था या बंडखोर वगैरे म्हणवून घेणाऱ्या झाडी-डोंगरातील गटाची होणार आहे. म्हणून ज्यांचा आत्मा आजही जिवंत आहे, त्यांनी त्या डबक्यातून बाहेर पडावे व महाराष्ट्राच्या स्वर्गात यावे. असे आवाहन संजय राऊत यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Eknath Shinde : बहुमत चाचणीसाठी उद्या मुंबईत जाणार – एकनाथ शिंदे
- Sanjay Raut : ‘त्या’ दिलाशाचे लाभार्थी कोण ते भविष्यात उघड होईलच; संजय राऊत
- Sandeep Deshpande : ‘काळजी’च्या नावाने उद्धव ठाकरे पाहात आहेत त्यांचा स्वार्थ?; ‘मनसे’चा व्यंगचित्रातून प्रहार
- IRE vs IND 2nd T20 : आयर्लंडनं भारताला फोडला घाम..! हार्दिकसेनेचा २-० असा मालिकाविजय
- Maharashtra Crisis : उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर देशद्रोहाखाली FIR नोंदवण्याची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
