🕒 1 min read
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटातील आपसी भांडण वाढत चालले आहे. एकीकडे बंडखोर एकनाथ शिंदे महाराष्ट्र सरकार पाडण्यासाठी दोनतृतीयांशपेक्षा जास्त आमदार असल्याचा दावा करत असताना दुसरीकडे उद्धव ठाकरे संघटना मजबूत करण्याबरोबरच सरकार वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. शिवसेनेवर कोणाचा अधिकार असावा यावरूनही चांगलाच वाद सुरु आहे. दरम्यान, शिंदे गटाच्या अडचणीत वाढ झाली आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी १६ बंडखोर आमदारांना नोटीस बजावली आहे.
महाराष्ट्रातील राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी शिंदे यांच्यासह १६ बंडखोरांना नोटीस बजावली आहे. सर्व आमदारांना २७ जून रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत उत्तर देण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. दुसरीकडे शिवसेनेने शिंदे गटाला बाळासाहेबांचे नाव देण्याविरोधात निवडणूक आयोगाकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे.
एकनाथ शिंदे यांचे समर्थक कोणत्याही पक्षात विलीन होण्याचा विचार करत नसल्याचे शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी स्पष्टपणे सांगितले. याबाबत भाजप किंवा कोणत्याही पक्षाशी आमची चर्चा झालेली नाही. आपल्या १६ आमदारांवर निलंबनाची नोटीस पाठवणाऱ्या विधानसभा उपसभापतींविरोधात शिंदे गटाचे आमदार न्यायालयात जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दीपक केसरकर म्हणाले, “विधानसभेच्या उपध्यक्षांना हे करण्याचा अधिकार नाही. कायद्यानुसार आमचे सदस्यत्व कोणीही रद्द करू शकत नाही. शिवसेनेचे दोन तृतीयांश आमदार आमच्यासोबत आहेत. बहुमताशिवाय हा निर्णय कसा होऊ शकतो.”
संजय राऊत म्हणाले, “पक्ष सोडणाऱ्यांवर काय कारवाई होणार हे संध्याकाळपर्यंत कळेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेले काम कौतुकास्पद आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व निवडणुका लढवू. शिवसेना सोडून गेलेल्या नेत्यांनी शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने मते मागू नयेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. त्यांनी त्यांच्या वडिलांच्या नावावर मते मागावी. महाविकास आघाडी एक आहे. आम्ही ६ ठराव पारित केले असून शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारसरणीवर चालणार असून संयुक्त महाराष्ट्राच्या विचारधारेशी तडजोड करणार नाही, असा निर्धार केला आहे. पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. बंडखोरांवर कारवाई करण्याचे अधिकार मुख्यमंत्री ठाकरे यांना आहेत.”
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
