🕒 1 min read
नाशिक: संजय राऊत यांच्या बोलण्याला काही किंमत नाही. ज्या वेळेस आमची सत्ता होती, तेव्हा संजय राऊत कुठे होते? संजय राऊत यांना याआधी कोणी ओळखत नव्हते. मागच्या काही दिवसांपासून त्यांना लोक ओळखायला लागले. राष्ट्रवादीचे प्रवक्ते म्हणून बोलायला लागले, तेव्हा त्यांची ओळख झाली, अशी खोचक टीका गिरीश महाजन यांनी राऊतांवर केली आहे.
राऊतांकडून करण्यात आलेल्या फोन टॅपिंगच्या आरोपावर बोलताना भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी राऊत यांच्यावर हल्लाबोल केला. नाशिकचे प्रभारीपद मिळाल्यानंतर महाजन पहिल्यांदा नाशिकमध्ये आले होते तेव्हा ते माध्यमांशी बोलत होते. शिवसेना आम्हाला सोडून गेली त्यात सर्वात मोठा पुढाकार संजय राऊत यांचा होता. त्यानंतर त्यांना लोक ओळखायला लागले, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
राऊत यांच्या जीभेला हाड उरले नाही. आमच्या काळात फोन टॅप झाले याबाबतचे कोणतेही पुरावे नाहीत. आरोप करताय तर पुरावे द्या ना, असे म्हणत गिरीश महाजन यांनी राऊतांवर टीका केली. रश्मी शुक्लाप्रकरणी बोलताना ते म्हणाले कि, राज्य सरकार आणि पोलीस यंत्रणा काम करत आहेत. या चौकशीत काही पुरावे समोर आले तर त्या गोष्टीला अर्थ आहे.
सत्ताधाऱ्यांकडून राज्यपालांवर होणाऱ्या टीका आणि राज्यपाल हटावची मागणी यावरही त्यांनी टीका केली. राज्यपालांची नेमणूक ही शिवसेना किंवा राष्ट्रवादीच्या हातात नाही. आमच्या मनासारखं करा नाहीतर राज्यपालांना हटवा अशी त्यांची भूमिका आहे. शासनाच्या आणि पोलीस खात्याच्या बदल्यांमध्येही हाच प्रकार सुरू आहे. मनासारखं करा नाही तर हटवा, हेच धोरण सध्या राज्यात राबवले जात आहे. पण राज्यपालांचं पद संवैधानिक आहे. कोणी कितीही म्हटलं तरी त्याकडे आम्ही फारसे लक्ष देत नाही, असे महाजन म्हणाले.
निवडणुका नकोच
जोपर्यंत ओबीसी आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नये अशी आमची मागणी आहे. या सरकारने कोर्टाला अहवाल पाठवला त्यावर सही, तारीखही नव्हती. मंत्रिमंडळाच्या बैठका घेतात पण मुख्यमंत्री सही करत नाहीत. त्यामुळे हे राज्य सरकार नाकर्ते आहे, असंही महाजन म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
