🕒 1 min read
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी आजच्या(२५ डिसें.)आपल्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून कोरोनाची तिसरी लाट आणि ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या नवीन निर्बंधांविषयी भाष्य केले आहे. तसेच नियमांचे पालन सगळ्यात आधी पंतप्रधानांनी करायला हवे, असेही राऊत म्हणाले आहेत.
लेखात राऊत म्हणाले आहेत की,’कोरोनाचा रोज नवा ‘अवतार’ निर्माण होत आहे. त्यामुळे जगाच्या आरोग्य व्यवस्थेतील गुंतागुंत वाढू शकेल. महाराष्ट्रात ओमायक्रोनचे नवीन २३ रुग्ण आढळले. कोरोनाचा संसर्ग काहीसा ओसरू लागल्यावर सरकारने निर्बंध हटविले. लोक गाडी-घोडे, रेस्टॉरंट, मॉल्स, नाटक-चित्रपटगृहांत फिरू लागले. लोकल ट्रेन्सच्या दारात नेहमीप्रमाणे प्रवासी लटकू लागले. विमानतळांवर जत्रा भरल्या. देशभरातील ‘खाऊगल्ल्या’ फुल्ल झाल्या. लग्न, समारंभ, पाटर्य़ा ओसंडून वाहू लागल्या व त्याहीपेक्षा ज्या चार-पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होत आहेत तेथे आपले पंतप्रधान मोदी यांच्यासह अनेक राजकीय पुढाऱ्यांच्या गर्दीच्या सभा होत आहेत. त्या गर्दीत कोरोनाचे कोणतेही नियम किंवा निर्बंध पाळले जात नाहीत. उत्तर प्रदेशात अखिलेश यादव, प्रियंका गांधी यांच्या सभांना आणि रोड शोंना मोठा प्रतिसाद मिळत आहे. पण शेवटी कोरोनाचे नियम पाळायलाच हवेत. अर्थात मोदी हेच वाराणसीपासून लखनौपर्यंत जाहीर सभा घेत आहेत. नियमांचे पालन सगळ्यात आधी पंतप्रधानांनी केले पाहिजे. पंतप्रधान मोदी हे उत्तर प्रदेशात जाहीर सभा घेतात व दिल्लीत येऊन कोरोना, ओमायक्रोनच्या वाढत्या रुग्णसंख्येबाबत आरोग्य खात्याच्या बैठका घेऊन चिंता व्यक्त करतात. कोरोनाविरोधातला लढा अद्याप संपलेला नाही.’
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’सतर्क आणि सावधान रहा अशा सूचना मोदी देतात. दिल्लीत गुरुवारी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली. त्यातील छायाचित्रात आपले पंतप्रधान वगळता सगळ्यांनीच ‘मास्क’ घातले आहेत. पंतप्रधानांचे आरोग्यसुद्धा देशासाठी मोलाचे असल्याने त्यांनीही ‘सतर्क आणि सावधान रहा’ या स्वसंदेशाचे पालन केले पाहिजे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. महाराष्ट्रातही निदान रात्रीचे निर्बंध घालावेत यासाठी हालचाली सुरू आहेत. संचारबंदी, निर्बंध आले म्हणजे पुन्हा आताच सुरू झालेल्या अर्थचक्राचे चाक रुतून बसणार. खरे तर देशात नेत्यांचे दौरे, जाहीर सभा, मेळावे, मोर्चे, संप सर्वकाही बिनधोक सुरू आहे, पण निर्बंधाच्या चरकात सामान्य जनताच पिळून निघते’, असेही राऊत म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- नवाब मलिकांच्या ‘अतरंगी’ फोटोनंतर नितेश राणेंनी शेअर केला ‘हा’ फोटो; म्हणाले,‘ओळखा पाहू कोण?’
- ‘रात्रीस खेळ चाले’चा हा प्रयोग प्रभावी ठरणारा असला तरी…- संजय राऊत
- द. आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी ‘विराट’सेनेचे फोटोशूट : पहा व्हिडिओ
- महाराजस्व अभियानांतर्गत विशेष मोहिम… शेतकऱ्यांना मिळणार ‘हे’ महत्वाचे पाच लाभ
- वेंगसरकरांचे गांगुली-विराटबाबत मोठं वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
