🕒 1 min read
औरंगाबाद: कृषिपंपाचे वीजबिल आज भरू, उद्या भरू असे म्हणत महावितरणच्या कृषी वीज धोरणात ५० टक्के सवलतीचा लाभ घेण्यासाठी आता केवळ ९९ दिवस उरले आहेत. येत्या ३१ मार्चला ५० टक्के माफीची मुदत संपणार असून, एप्रिलपासून बिलात फक्त ३० टक्के माफी मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मुदत संपण्याची वाट न पाहता अभियानात सहभागी होऊन आपल्या कृषिपंपाची थकबाकी तसेच चालू बिले भरून ५० टक्के माफी मिळवावी तसेच वीजपुरवठा खंडित होण्याची नामुष्की टाळावी, असे आवाहन औरंगाबाद महावितरण परिमंडलाचे मुख्य अभियंता भुजंग खंदारे(Bhujang Khandare) यांनी केले आहे.
औरंगाबाद परिमंडलात कृषिपंप वीजबिल वसुलीस प्रतिसाद मिळत आहे. ज्या गावात वसुली, त्याच गावात काम असा निकष ठेवल्याने अनेक गावे वसुलीसाठी पुढे येत आहेत. कृषी वीज धोरण शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी शेतीच्या बांधावर, गावच्या पारावर मेळावे घेतले जात आहेत. धोरण पोहोचले असले तरी ‘बिल आज भरू, उद्या भरू’च्या मानसिकतेमुळे एक वर्ष निघून गेले असून, आता फक्त ९९ दिवस उरले आहेत. औरंगाबाद परिमंडलात धोरणापूर्वी शेतीची थकबाकी ४ हजार ४६२ कोटींच्या घरात होती.
दंड-व्याजातील सूट, निर्लेखन व बिल दुरुस्ती समायोजनातून १८२० कोटी माफ झाले आहेत. तर सुधारित थकबाकीतही ५० टक्के थकबाकी माफ होत असल्याने शेतकऱ्यांना ५० टक्के हिश्श्यापोटी १२३१ कोटी अधिक सप्टेंबर २०२० पासूनचे चालू बिल ६३९ कोटी असे मिळून फक्त १९६० कोटी भरायचे आहेत. या देय रकमेपोटी आतापर्यंत ५२ कोटी २१ लाखांचा भरणा वर्षभरात झालेला आहे. वसुलीचे हे प्रमाण केवळ २.६६ टक्के इतकेच आहे. योजनेसाठी पात्र असलेल्या ३ लाख ५५ हजार ८४४ शेतकऱ्यांपैकी ८२ हजार ४३३ शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग घेतला असला तरी केवळ ३ हजार १५४ शेतकऱ्यांनीच योजनेचा संपूर्ण लाभ घेतला आहे.
वसूल रक्कमेतील ३३ टक्के रक्कम गाव पातळीवर व ३३ टक्के रक्कम जिल्हा पातळीवर विजेच्या पायाभूत कामात वापरली जात असल्याने पैसे भरणाऱ्या शेतकऱ्यांची वीज समस्यांतून मुक्तता होत आहे. वसुलीमुळे उपलब्ध झालेल्या कृषी आकस्मिक निधीतून आतापर्यंत २३९७ कृषी वीज जोडण्या देण्याचे काम झाले आहे. ३ नवीन उपकेंद्रांची भर पडणार आहे. तसेच एका उपकेंद्रांची क्षमतावाढ होणार आहे. तसेच नवीन रोहित्रे उभारण्यासह त्यांची क्षमतावाढही केली जाणार आहे. योजनेचा लाभ घेऊन उर्वरित शेतकऱ्यांनी त्यांची बिले भरली तर औरंगाबाद परिमंडलातील शेतकऱ्यांना अखंडित व पुरेशा दाबाने वीज देणे शक्य होईल.
महत्त्वाच्या बातम्या
- अहमदाबाद IPL फ्रँचायझीला मिळणार ग्रीन सिग्नल
- चंद्रकांत पाटलांना मेडिकल हेल्पची गरज,आम्ही त्यांना वैद्यकीय मदत देऊ- संजय राऊत
- द. आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी ‘विराट’सेनेचे फोटोशूट : पहा व्हिडिओ
- महाराजस्व अभियानांतर्गत विशेष मोहिम… शेतकऱ्यांना मिळणार ‘हे’ महत्वाचे पाच लाभ
- वेंगसरकरांचे गांगुली-विराटबाबत मोठं वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
