बीड : बीड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना तत्काळ मदत करण्यासाठी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवत मदतीची मागणी करत जिल्ह्यात उद्भवलेल्या परिस्थितीची माहिती दिली आहे. पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्ह्यासाठी विशेष आर्थिक पॅकेजेची मागणी आपल्या पत्रातून केली आहे.
त्यांनी म्हटले की, यंदा जिल्ह्यात ११ वेळा अतिवृष्टी झाली. तर मागील १५ दिवसांत जिल्ह्यात तीन वेळा ढगफुटीसदृश्य अतिवृष्टी झाली व ही परिस्थिती आणि पावसाचा जोर अद्यापही विसावलेला नाही. जूनपासून आजपर्यंत जिल्ह्यात एकूण ९७३ मिमी पाऊस झाला. मांजरा नदीकाठच्या २४ गावांत पाणी शिरले असून काही गावांतील लोकांना अन्यत्र स्थलांतरित केले आहे. पुरात अडकून घरावर, झाडावर आधार घेतलेल्या अंबाजोगाई तालुक्यातील दोन गावांतील ७७ नागरिकांना सुखरूप वाचवण्यात बचाव पथकांना यश आले. मात्र, पशुहानी झाली आहे.
दोन महिन्यांत पुरात वाहून १४ जणांचे प्राण गेले. जिल्ह्यातील ६३ पैकी ६१ मंडळात अतिवृष्टी झाली. ७ लाख ७३ हजार हेक्टर लागवड क्षेत्रापैकी ५ लाख २५ हजार हेक्टर शेतीचे नुकसान झाले. कच्ची घरे, पक्की घरे, झोपड्या यांचीही बऱ्याच ठिकाणी मोठी पडझड झाली असून ५०९ पेक्षा अधिक दुभती जनावरे वाहून गेलीत. विशेषकरून नदीकाठच्या गावांत आतापर्यंत सुमारे १६७ किमी रस्ते तुटून किंवा वाहून गेले.
तर गेवराई, अंबाजोगाई, परळीसह काही तालुक्यांतील पूल तुटले किंवा वाहून गेले अशीही जवळपास १६ उदाहरणे आहेत. या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करत जिल्ह्याला विशेष आर्थिक पॅकेज घोषित करून ते तातडीने लागू करावे व नुकसानग्रस्त शेतकरी, कष्टकरी व नागरिकांना अर्थसाहाय्य देण्यासाठी संबंधितांना आदेश व्हावेत, असे धनंजय मुंडे यांनी पत्रात म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- नगरमध्ये उपसरपंचाच्या जाचाला कंटाळून ग्रामसेवकाची आत्महत्या
- ‘शेतकऱ्यांवर आस्मानी संकट कोसळलेय, सुलतानी संकट टाळा’, पंकजा मुंडेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
- ‘काळजी करू नका, तुम्हाला मदत मिळवून देणारच’, फडणवीसांची शेतकऱ्यांना ग्वाही
- ‘अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये शिवसेना संपविण्याचे काम केले’, सुभाष साबणेंचा आरोप
- ‘देशमुख व परमबीरपैकी एकाला ‘वर्षा’वर तर दुसऱ्याला ‘मातोश्री’वर लपवलेय!’, सोमय्यांचा गंभीर आरोप


