🕒 1 min read
मुंबई – गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यासह राज्यातील काही भागात तुफान पाऊस कोसळत आहे. यामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. शेतकऱ्यांचं यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. हजारो हेक्टरवरील पिकं पाण्यात गेल्याने बळीराजाचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी पिकं सडली आहेत तर काही ठिकाणी सोयाबीन जागेवरच उगवत असल्याचं देखील समोर आलं आहे. या नुकसानीमुळं शेतकरी हवालदिल झाला असून सरकारनं तात्काळ मदत करावी अशी मागणी केली जाऊ लागली आहे.
या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एक पत्रक काढत शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची मागणी सरकारकडे केली आहे. राज ठाकरे यांनी पत्रकात म्हटलं आहे की, महाराष्ट्राच्या काही भागात, मुख्यत: मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात, पावसानं कहर केला आहे. हाता-तोंडाशी आलेलं पीक तर गेलंच आहे परंतु घरा-दाराचं नुकसानही फार झालं आहे असं राज ठाकरे म्हणाले. ही वेळ आणीबाणीची आहे. अशा वेळेस पंचनाम्याचे सोपस्कार होत राहतील. पंरतु त्याआधी प्रत्येक नुकसानग्रस्त घराला, शेतकऱ्याला ५० हजार रुपयांची मदत सरकारनं ताबडतोब जाहीर करावी आणि प्रत्यक्षात तत्काळ द्यावी. आधी करोना संसर्ग आणि नंतर अतिवृष्टीनं शेतकरी फार कोलमडला आहे, अशा वेळी निव्वळ आश्वासनं आणि शब्दांपेक्षा शीघ्र कृतीची गरज आहे.” अशी मागणी राज ठाकरे यांनी सरकारकडे केली आहे.
दरम्यान, याच मागणीवरती प्रतिक्रीया देताना जळगावचे पालकमंत्री आणि शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ‘ राज ठाकरे यांनी मागणी केली हे मान्य, मात्र मागणी करणं सोपं तसेच सर्व निर्णय पंचनाम्यानंतर जिथे परिस्थिती असेल तिथे ओला दुष्काळ जाहीर होणारच आणि राज ठाकरेंनी मागणी केली म्हणजे काही मोठं काम केलं नाही असं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. केंद्र सरकारने जीएसटीचे GST 50 हजार कोटी दिले नाही, शेतकऱ्यांना काय मदत देणार? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- राज ठाकरेच्या 50 हजार रुपये नुकसान भरपाईच्या मागणीवर अजित पवारांची प्रतिक्रिया
- महिलांवरील अत्याचाराच्या घटना ही चिंतेची बाब – निलम गोऱ्हे
- सहा महिन्यानंतर प्रत्येक सरकारी खात्यात ईलेक्ट्रिक वाहने असतील- आदित्य ठाकरे
- ओला दुष्काळ जाहीर करण्याचा विचार सुरु- विजय वडेट्टीवार
- ‘व्वा रे बिट्या… तुला कुणी सांगितलं ? महाराष्ट्रातील अर्धे मंत्रिमंडळ हॉस्पिटलमध्ये तर अर्धे तुरुंगात जाईल म्हणून’


