🕒 1 min read
मुंबई : भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्रच्या नेत्यांचे शिष्टमंडळ पक्षाच्या पूर्वनियोजित योजनेनुसार आपल्या नेतृत्वाखाली तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर गेले व त्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा, राष्ट्रीय संघटनमंत्री संतोष यांच्यासह भाजपाच्या केंद्रीय मंत्र्यांशी सविस्तर चर्चा केली. राज्यातील संघटनात्मक कार्य आणि विकासकामांच्या दृष्टीने हा दौरा अत्यंत उपयुक्त ठरला. तथापि, पक्ष संघटनेत मोठे बदल करण्याची कोणताही चर्चा त्यामध्ये नव्हती, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी मुंबईत दिली.
भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे, प्रदेश सरचिटणीस (संघटन) श्रीकांत भारतीय आणि प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, दरवर्षी संसदेच्या एका अधिवेशनात राज्यातील भाजपा नेत्यांनी दिल्लीत जावे आणि पक्षाच्या खासदारांशी राज्यातील प्रश्नांच्या पाठपुराव्याबाबत विचारविनिमय करावा, अशी पक्षाची परंपरा आहे. कोरोनामुळे ही परंपरा खंडीत झाली होती. आता पुन्हा त्या पद्धतीने आपल्या नेतृत्वाखाली प्रदेश संघटनेतील निवडक नेत्यांचे शिष्टमंडळ तीन दिवस दिल्ली भेटीवर गेले होते.
या भेटीत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व संघटनमंत्र्यांना भेटण्यासोबतच राज्यातील नवनियुक्त केंद्रीय मंत्री तसेच ज्येष्ठ मंत्र्यांची भेट झाली. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील यांच्या निवासस्थानी भोजनाच्या निमित्ताने सर्व खासदारांची भेट झाली. या भोजन समारंभात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे व पंकजा मुंडे सहभागी झाले. या विचारविनिमयातून राज्यातील विकासकामांच्या दृष्टीने बरीच उपयुक्त माहिती मिळाली. आता नियमितपणे पक्षाचे राज्यातील पदाधिकारी दिल्लीत जाऊन राज्याच्या प्रश्नांबाबत पाठपुरावा करतील, असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं.
पुढे ते म्हणाले की, आपल्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ हे केवळ संघटनात्मक आणि विकासकामांच्या दृष्टीने चर्चा करण्यासाठी गेले होते. राज्यात पक्षामध्ये संघटनात्मक बदल करण्याचा विषय नव्हता. संघटनात्मक पदांसाठी लॉबिंगच्या बातम्या निराधार आहेत, असं देखील पाटील यांनी स्पष्ट केलंय.
राज ठाकरेंची भेट दिल्लीश्वरांच्या कानावर –
त्यांनी सांगितले की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत झालेल्या भेटीची माहिती आपण केंद्रीय नेतृत्वाला दिली. ठाकरे यांच्यासोबतची भेट भूमिका समजून घेण्यासाठी होती व त्यामध्ये दोन्ही पक्षांच्या युतीचा प्रस्ताव नव्हता, असे आपण केंद्रीय नेतृत्वाला सांगितल्याचं देखील चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘सगळं ठाकरे सरकारच झिंगलंय कारण कुटुंब वसुलीत रंगलय’
- ‘MPSC आयोगामध्ये ठराविक एका जातीच्याच लोकांची नियुक्ती’; प्रीतम मुंडे लोकसभेत कडाडल्या
- ठरलं ! 17 ऑगस्टपासून राज्यातील ‘या’ इयत्तेचे वर्ग भरणार
- नांदेड विभागातून तीनशेवी किसान रेल्वे सुसाट; महसूलात कोटींनी वाढ!
- बालाजी तांबे यांच्या निधनाने आयुर्वेद क्षेत्राची मोठी हानी – डॉ. नीलम गोऱ्हे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
