🕒 1 min read
नागपूर : मागील महिन्यात शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला होता. भाजप युवा मोर्चाने शिवसेना भवनावर काढलेल्या मोर्चामुळे शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्ते आमने-सामने आले होते. यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये कटुता अधिक वाढली आहे. याच दरम्यान, शनिवारी भाजप प्रदेश उपाध्यक्ष आणि आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेना भवनाबद्दल केलेल्या विधानामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.
प्रसाद लाड हे दादर येथील कार्यक्रमात म्हणाले होते की, ‘शिवसेनेला वाटत की आम्ही माहीममध्ये आल्यावर सेनाभवन फुटेल. त्यांना सांगतो की वेळ आली तर आम्ही ते सुद्धा करू.’ यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. तर शिवसैनिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. यामुळे आता प्रसाद लाड यांनी आपल्या बोलण्याचे खापर माध्यमांवर फोडले आहे. मी तसे म्हणालोच नाही असे म्हणत लाड यांनी घुमजाव केले आहे.
याबाबत माध्यमांनी नागरपूरमध्ये विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न केला असता ते म्हणाले, ‘तोडफोड करणं आमची संस्कृती नाही. आम्ही तोडफोड करत नाही. काल प्रसाद लाड यांचे जे वक्तव्य समोर आले किंवा जे त्यांनी म्हटल्याचे सांगितले गेले, त्याबद्दल त्यांनी व्हिडीओद्वारे खुलासाही केला आहे. आमच्यासाठी विषय संपला आहे. आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही आणि आला तर सोडत ही नाही.’
प्रसाद लाड यांची सारवा सारव –
सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रकाशित करून लाड यांनी शिवसेना प्रमुखांचा आम्ही नेहमीच आदर करतो आणि त्याच शिवसेनाप्रमुखांच्या सेना भवनाबद्दल आम्ही कधी वाईट बोलण शक्य नाही. प्रसारमाध्यमांतून माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला’ असे म्हणत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे.
ते म्हणाले, ‘माझं असं म्हणणं होतं की आम्ही माहीममध्ये जेव्हा येतो, तेव्हा एवढा बंदोबस्त ठेवला जातो, की जणूकाही आम्ही शिवसेना भवनच फोडायला जाणार आहोत. त्या बातमीचा विपर्यास करून जे काही दाखवण्यात आलं आहे, त्यावर माझं हे स्पष्टीकरण आहे. मला कोणत्याही प्रकारे शिवसेना प्रमुख आणि शिवसेना प्रमुखांनी बांधलेल्या वास्तूचा अनादर करायचा नव्हता. जर मी कुणाचं मन दुखावलं असेल, तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. पण घाबरण्याचं कोणतंही कारण नाही. जेव्हा आरे ला कारे होईल, तेव्हा कारेला आरेचं उत्तर दिलं जाईल अशी भूमिका लाड यांनी मांडली.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘प्रत्येक संकटावर मात करण्याची हिंमत मुख्यमंत्र्यांनी दाखवली’ ; पवारांनी केले कौतुक
- ‘थप्पड से डर नहीं लगता… अशी एक झापड देऊ, पुन्हा कधी उठणार नाही!’, मुख्यमंत्री ठाकरे संतापले
- ‘भविष्यात मोदी कृपेने स्वतःच्या पैशाकडे पाहण्यासाठीही पैसे लागू नयेत म्हणजे मिळवलं!’
- ‘पकडापकडीचा खेळ खेळणारे मोदी सरकारला आव्हान देताहेत’, भाजपचा शरद पवारांना टोला
- काँग्रेस गाजावाजा करत नाही, प्रत्यक्ष मदत करते- नाना पटोले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
