🕒 1 min read
पुणे – “भाजप प्रदेशाध्यक्षांनी माझ्यावर नेटवर्कबाहेर असल्याचा आरोप करण्यापूर्वी, त्यांच्या पक्षाचे किती लोकप्रतिनिधी मला भेटतात, किती मंत्री, अधिकारी, लोकप्रतिनिधींशी मी संपर्क साधून चर्चा केली, याची माहिती घेतली असती, तर असे खोटे आरोप करण्याची त्यांची हिंमत झाली नसती” असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे. दोन दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली होती या टीकेला पवार यांनी आपल्या खास शैलीत प्रत्युत्तर दिले आहे.
“टेलिव्हिजनच्या पडद्यावर चमकण्यासाठी हपापलेल्या विरोधी पक्षनेत्यांनी बिनबुडाचे आरोप करुन राज्यात गोंधळाची स्थिती निर्माण करु नये. कोरोनाविरुद्धच्या लढाईत राज्याला कमकुवत करण्याचं पाप करु नये” असा इशारा अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेत्यांना दिला आहे.
दररोज सकाळी सात वाजल्यापासून प्रत्यक्ष भेटीसाठी मी सर्वांना उपलब्ध असतो. सन्माननीय मुख्यमंत्री, मंत्री, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी सर्वांशी दिवसभर संपर्क, संवाद सुरु असतो. भाजपचेही कितीतरी आमदार, आजी-माजी नेते दररोज भेटतात. तेही दिवसभर फोन करतात. मंत्रालयात सोमवार ते गुरुवार सकाळी नऊ वाजता मी हजर असतो. पुण्यात शुक्रवार, शनिवारी आणि रविवारी बारामतीत दिवसभर कार्यक्रम सुरु असतात. गेली दीड वर्षे हा कार्यक्रम अखंड सुरु आहे. कायम लोकांच्या सतत संपर्कात राहणारा मी कार्यकर्ता आहे. मंत्रालयात आणि राज्यातील जनतेत मी कायम उपस्थित असताना ‘अजित पवार नेटवर्कबाहेर’चा आरोप करणाऱ्यांचा हेतू व मेंदू तपासून घेण्याची गरज आहे असेही अजित पवार म्हणाले.
महाराष्ट्र सध्या कोरोनाच्या भीषण संकटाशी लढत आहे. कोरोनाची रुग्णसंख्या दररोज वाढत आहे. रुग्णांना पुरेसे बेड उपलब्ध करणे, हॉस्पिटलचा ऑक्सिजन पुरवठा, रेमडेसिवीर इंजेक्शनची उपलब्धता सुनिश्चित करणे, ही माझी प्राथमिकता आहे. त्यासाठी मुख्यमंत्री महोदयांशी, सहकारी मंत्र्यांशी, लोकप्रतिनिधींशी, विभागीय आयुक्तांशी, जिल्हाधिकाऱ्यांशी सातत्याने संवाद सुरु आहे. उद्योगक्षेत्राशी चर्चा केली जात आहे. त्यातून राज्यातील जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न सुरु आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रित ठेवणे आणि रुग्णांना उपचारांची सोय उपलब्ध करणे ही आजची सर्वोच्च प्राथमिकता आहे. अशा परिस्थितीत भाजपचे नेते खोटे-नाटे आरोप करुन महाराष्ट्राची कोरोनाविरुद्धची लढाई कमकुवत करत आहेत. त्यांची वक्तव्ये ही राज्यात गोंधळाची परिस्थिती निर्माण करुन राज्याला अडचणीत आणणारी आहेत. भाजपच्या नेत्यांनी त्यांचा वेळ आणि ताकद केंद्राकडून महाराष्ट्राला अधिकाधिक मदत मिळवून देण्यासाठी वापरावी, ते महाराष्ट्रातील जनतेसाठी हितावह ठरेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
महाराष्ट्रातील शासकीय, निमशासकीय, स्वयंसेवी संस्थांची यंत्रणा कोरोनाविरुद्धच्या लढाईत चांगलं काम करत असून कोरोनाविरुद्धची लढाई महाराष्ट्र जिंकेलच असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. महाराष्ट्राची कोरोनाविरुद्धची लढाई कमकुवत करण्याचं पाप विरोधी पक्षांनी करु नये, असा इशारावजा आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- धक्कादायक बातमी : विरारमध्ये कोव्हिड रुग्णालयाला मध्यरात्री भीषण आग, १३ रुग्णांचा मृत्यू
- राज्यात पुन्हा एकदा प्रवास करण्यासाठी ई- पासची गरज, महाराष्ट्र पोलिसांची माहिती
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमरनाथ यात्रेसाठीची नोंदणी प्रक्रिया तात्पुरती स्थगित
- धक्कादायक बातमी : ऑक्सिजनचा दाब कमी झाल्याने दिल्लीत २५ रुग्णांचा मृत्यू
- प्रसिद्ध अभिनेता अमित मिस्त्रीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
