पुणे: देशातील वाहन उद्योग कोरोनाच्या पहिल्या लाटेतून सावरत नाही तर आता दुसऱ्या लाटेत देखील वाहन उद्योगाला फटका बसत असल्याचं समोर येत आहे. ज्याप्रमाणे गेल्यावर्षी लॉक डाऊन मध्ये वाहन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडून उत्पादन थांबवण्यात आलं होतं. त्यामुळे कंपन्यांसह कर्मचाऱ्यांना देखील मोठा आर्थिक फटका बसला होता. आता देखील टाटा मोटर्सने पुण्यातील उत्पादन थांबवलं आहे.
राज्यात 14 एप्रिलला रात्री आठ वाजल्यापासून एक मेपर्यंत महाराष्ट्रात संचारबंदी लागू करण्यात आल्याने या पार्श्वभूमीवर, टाटा मोटर्सने पुण्यातील त्यांच्या फॅक्टरीतील उत्पादन 15 एप्रिल ते 30 एप्रिल 2021 या कालावधीत बंद ठेवण्यात येणार असल्याचं एका पत्राद्वारे जाहीर केलं आहे. महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यासाठी मर्यादित कामगार संख्येने टाटा मोटर्सचे पुणे प्लांटमधील काम सुरू आहे. पण याठिकाणी उत्पादन बंद ठेवण्यात आलं आहे.
या संदर्भात टाटा मोटर्सने पुण्यातील भोसरी याठिकाणी असणाऱ्या एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये पत्र सादर केलं असून यामध्ये महाराष्ट्र सरकारने ब्रेक द चेन आदेशात नमूद केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करून टाटा मोटर्स आपल्या पुणे प्लांटमध्ये कार्यरत आहेत. मर्यादित कर्मचारी सर्व सुरक्षा प्रोटोकॉल, अंतराचे निकष आणि स्वच्छता मानकांचे पालन करत याठिकाणी उपस्थित आहेत. मात्र कंपनीत अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी कंपनीची बससेवा सुरू ठेवण्याची परवानगी देण्याची विनंती टाटा मोटर्सतर्फे करण्यात आली आहे.
या मध्ये डिस्पेन्सरी, डीजी सेट ऑपरेशन, अग्निशमन यंत्रणा, पाणीपुरवठा, 22 केव्ही सबस्टेशन, सिक्युरिटी व्हिजिलन्स आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प त्याचबरोबर क्रेन्स, रोड लेव्हलर्स, एक्सॅव्हेटर्स यांसारख्या कन्स्ट्रक्शन एक्विपमेंट्सचे उत्पादन करणारे सहा प्लांट्स आणि टायर्स, विंडशिल्ड्स, स्टीअरिंग मेकॅनिझम या भागांची निर्मिती करणारे प्लांट्स यांचा अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांमध्ये समावेश करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘एक नारळ दिलाय दर्या देवाला’ ; व्हायरल गाण्यावर रितेशचा भन्नाट डान्स
- पुणे जिल्ह्यासाठी कोरोना लसीचा कोटा वाढवून द्या, भाजप आमदाराचे जावडेकरांना साकडे
- बंगाल निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेस उमेदवाराचा कोरोनाने मृत्यू
- विराट कोहली ठरला दशकातील सर्वोत्तम खेळाडू
- मला चंपा म्हणणं बंद करा, अन्यथा… चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांना इशारा


