🕒 1 min read
मुंबई- भाजपा बाजूला सारून महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. भाजप हा महाराष्ट्रात चांगलाच प्रबळ पक्ष बनला असल्याने महाविकास आघाडीची एकजूट कायम राहिली तरच भाजपचा पराभव करणे शक्य असल्याचे गेल्या काही निवडणूक निकालांवरून सिद्ध झाले आहे.
ग्रामपंचायत तसेच विधान परिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीतही महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी दणदणीत विजयी मिळवला होता. महाविकास आघाडीची एकजूट कायम राहिली तर राज्यातील इतर महापालिका, नगरपालिका तसेच जिल्हा परिषदांमध्येही भाजपाला असाच धोबीपछाड दिला जाईल अशी शक्यता निर्माण झाली आहे.
महाविकास आघाडीची एकजूट कायम राहिली नाही तर मात्र भाजपला रोखणे अशक्य असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.तीन पक्षांची ताकत समोर उभी असूनही भाजप ज्या पद्धतीने टक्कर देत आहे ते सर्वांच्याच भुवया उंचावणारे आहे.जर हे पक्ष वेगवेगळे लढले तर मात्र भाजपला रोखणे अवघड होईल असा अंदाज वर्तविला जात आहे.
दरम्यान, एका बाजूला महाविकास आघाडी तसेच कॉंग्रेसला अनुकूल असे वातावरण असताना देखील कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा स्वबळाची भाषा केली आहे.आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, वसई विरार व ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिट्यांच्या बैठका घेऊन निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी बोलताना स्वबळावर लढण्यास तयार रहा असा आदेश दिला आहे.
नाना पटोले पुढे म्हणाले की, सध्या राज्यात काँग्रेस पक्षाला अनुकुल वातावरण असून काँग्रेस पक्षाला मानणारे लोकही मोठ्या संख्येने आहेत, कार्यकर्त्यांनी लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. पक्ष संघटना बळकट करण्यासाठी मायक्रो लेवलला काम करा आणि स्वबळावर लढण्यास तयार रहा. महापालिका निवडणुकीत वार्डनिहाय जबाबदारी दिली जाईल त्यानुसार काम करून पक्षाने दिलेल्या उमेदवाराला निवडून आणा.
कल्याण डोंबिवलीचा आढावा घेताना प्रतांध्यक्षांनी सर्व पदाधिकाऱ्यांची नावे घेऊन उपस्थित आहेत का हे पाहिले. काँग्रेसचे सैनिक म्हणून काम करा. पक्षाचे सर्व सेल, विभाग, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, सेवादल, एनएसयुआयच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमात सक्रीय सहभाग घेणे गरजेचे आहे त्यांना सोबत घ्या. काँग्रेस पक्षात सर्व समाज घटकाला न्याय देण्याची भूमिका राहिली आहे. चांगले काम केले तर आगामी विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसची सत्ता येईल असा विश्वास प्रदेशाध्यक्ष यांनी व्यक्त केला.
पक्षातील कार्यकर्त्यांचे,पदाधिकाऱ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी बऱ्याचदा नेत्यांना अशी विधाने करावी लागतात मात्र भाई जगताप यांच्यानंतर नाना पटोले यांनी देखील स्वबळाची भाषा केल्याने या मुद्द्याला गांभीर्य प्राप्त होते. प्रदेशाध्यक्ष या नात्याने पक्ष वाढीसाठी नानांनी प्रयत्न करणे त्यांचे कर्तव्यच आहे मात्र हे केवळ कर्तव्यच आहे कि यामागे काही वेगळी रणनीती आहे हे अजून गुलदस्त्यात आहे.
भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे या एककलमी कार्यक्रमाखाली हे तिन्ही पक्ष एकत्र आले असले तरीही या पक्षांमध्ये धुसफूस नेहमीच सुरु असते. याशिवाय मुख्य म्हणजे महाविकास आघाडीतील प्रमुख तिन्ही पक्षात निवडणुकांच्या वेळी जागावाटप होताना एकमत होईल कि नाही याबाबत सर्वांनाच शंका आहे. त्यामुळे ऐनवेळी उमेदवारांची शोधाशोध करण्याची नामुष्की देखील ओढवली जाऊ शकते यातून विजय मिळवणे देखील कठीण होऊ शकते हे धोके लक्षात घेवूनच पटोले स्वबळाची भाषा करत असल्याचे काहींचे म्हणणे आहे.
दुसऱ्या बाजूला पटोले यांनी घेतलेल्या या आक्रमक पवित्र्याबाबत उलटसुलट चर्चा सुरु आहे. महाविकास आघाडीतील पक्षांचा एकमेकांवर विश्वास नाही का हा देखील सवाल उपस्थित होत आहे. जर कॉंग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवायची ठरवली तर सेना-राष्ट्रवादी नेमकी काय भूमिका घेणार हे अजून गुलदस्त्यात आहे. पाठीत खंजीर खंजीर खुपसला जाण्याचा धोका पटोले यांना वाटत आहे का हा देखील सवाल उपस्थित होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- जिल्हा मध्यवर्ती बँकासह सहकारी संस्थाच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर
- संजय राठोड यांच्यामुळे शिवसेनेची कोंडी; मित्रपक्षांच्या नाराजीने उद्धव ठाकरेंवर वाढला दबाव
- मंगलाष्टके नव्हे तर ‘वंदे मातरम्’च्या सुरात जुळल्या अनाथांच्या रेशीमगाठी
- पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाची मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पोलिस जनतेला का माहिती देत नाहीत ?
- ‘शक्ती कायदे मला बघावे लागतील, मंत्र्यांसाठी काही सुट आहे का ?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
