मुंबई : संजय राठोड तब्बल १५ दिवसांपासून अज्ञातवासात होते. १६ व्या दिवशी सर्वांसमोर येवून राठोड यांनी (२३ फेब्रुवारी) वाशिममधील पोहरादेवीचे दर्शन घेतले.यावेळी पोहरादेवी याठिकाणी संजय राठोड समर्थकांनी तुफान गर्दी केली होती. त्यामुळे कोरोनाचे नियम पायदळी तुडवल्याचे दिसून आले होते.
महाराष्ट्राची मान शरमेने झुकवणाऱ्या या सर्व प्रकारामुळे संजय राठोड यांच्यावर नियमभंगाची कारवाई केली जाणार का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.दरम्यान, दोन आठवड्यांहून अधिक काळानंतर संजय राठोड यांनी माध्यमांसमोर येत पत्रकार परिषद घेतली आणि आपल्यावरील सर्व आरोप धुडकावले आहेत.मात्र, विरोधकांनी संजय राठोड यांना ‘क्लीन चीट’ दिली नसल्याचे पाहायला मिळतंय.
अजूनही संजय राठोड यांच्यावर विरोधक नानाविध आरोप करत आहेत. तसेच राठोड यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करत आहेत.भाजपनेत्या चित्रा वाघ यांनी तर राठोड यांच्याविरोधात रान पेटवल्याचे पाहायला मिळत आहे.यासर्व प्रकारामुळे महाविकास आघाडी सरकारची चांगलीच नाचक्की होताना पाहायला मिळत आहे.
संजय राठोड यांच्या राजीमानाम्यासाठी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर मित्रपक्षांचा देखील दबाव असल्याचे पाहायला मिळत आहे.संजय राठोड प्रकरणाचा फटका मुख्यमंत्री आणि सरकारच्या प्रतिमेला बसत असल्याचं खासदार शरद पवार यांचं मत आहे. तसेच तपास पूर्ण होईपर्यंत वनमंत्री संजय राठोड यांनी पदापासून दूर राहावं, अशी शरद पवार यांची भूमिका आहे.संजय राठोड प्रकरणामुळे मुख्यमंत्री आणि सरकारची प्रतिमा मलीन होत असल्याचंही शरद पवारांचं म्हणणं आहे.
दुसऱ्या बाजूला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात वनमंत्री संजय राठोड यांनी मंगळवारी केलेल्या शक्ती प्रदर्शनावर नाराज आहेत. पोहरादेवी येथे झालेली गर्दी योग्य नव्हती असं बाळासाहेब थोरात म्हणाले. राज्याचे मुख्यमंत्री गर्दी टाळा असं आवाहन करत असताना गर्दी करणं योग्य नाही, असं मत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलं.दरम्यान,आघाडी सरकारमधील घटक पक्षांनीच टीकेचा सूर लावल्याने शिवसेना या प्रकरणात खिंडीत सापडली आहे.
दरम्यान,संजय राठोड यांनी बुधवारी वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली होती. या भेटीसाठी संजय राठोड यांना तब्बल पावणेदोन तास ताटकळत राहावे लागले होते. त्यानंतरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याशी केवळ दोन मिनिटे जुजबी चर्चा करुन काढता पाय घेतला होता. हा सारा घटनाक्रम पाहता उद्धव ठाकरे हे देखील संजय राठोड यांच्यावर नाराज असल्याचा अंदाज बांधला जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- जिल्हा मध्यवर्ती बँकासह सहकारी संस्थाच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर
- बीडमध्ये दहावी, बारावी वगळता सर्व शाळा बंद
- हिंगोलीत आणखी २७ अहवाल पॉझिटिव्ह; शहरात १२ कंटेनमेंट झोन जाहीर
- हर्सूल तलावात आत्महत्येचा प्रयत्न; सुरक्षा रक्षकाच्या सतर्कतेमुळे वाचला जीव
- काँग्रेस नेते राहुल गांधींनी लुटला केरळमध्ये समुद्र सफारीचा आनंद
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
