औरंगाबाद : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका कोरोनामुळे पुन्हा एकदा लांबणीवर पडल्या आहेत. ३१ मार्चपर्यंत या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्याची माहिती सहकार विभागानं दिली आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील कलम ७३ क मधील तरतुदीनुसार राज्य सरकारला कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमध्ये जनहिताच्या दृष्टीने सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा अधिकार आहे. त्यामुळे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पुन्हा एकदा या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत
कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका वेळोवेळी १८ मार्च २०२०, 17 जून २०२० आणि २८ सप्टेंबर २०२० रोजीच्या आदेशानुसार ३१ डिसेंबर २०२० पर्यंत, तर १६ जानेवारी २०२१ रोजीच्या आदेशानुसार ३१ मार्च २०२१ पर्यंत पुढे ढकलण्यात आलेल्या होत्या.
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे रुग्णांची संख्याही वाढतेय. ही बाब लक्षात घेता कोरोनाचा प्रभाव कमी करण्यासाठी, तसंच राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका सध्यस्थितीत पुढे सुरु ठेवणे उचित होणार नसल्याचं सरकारच्या लक्षात आलं. या पार्श्वभूमीवर सहकारी संस्था तसेच २५० पेक्षा कमी सदस्य संख्या असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्था वगळून, राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका या आदेशाच्या दिनांकापासून ज्या टप्प्यावर असतील त्या टप्प्यावर ३१ मार्च २०२१ पर्यंत पुढे ढकलण्यात आल्यात.
ज्या सहकारी संस्थांच्या निवडणुका या आदेशान्वये पुढे ढकलण्यात आलेल्या नाहीत त्यांच्या निवडणुका घेण्याबाबत शासनाच्या कोरोनासंदर्भातील मार्गदर्शक सुचनांचे काटेकोरपणे पालन करुन निवडणुका घेण्याबाबतची कार्यवाही करण्यात यावी. मात्र,२५० पेक्षा कमी सदस्य संख्या असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुकांबाबतचे नियम अंतिम झाल्यानंतरच सदर संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरु करण्यात यावा, असं सहकार मंत्रालयाने सूचित केलं आहे.
४७ हजार निवडणुका रखडल्या
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, साखर कारखाने, सुतगिरण्या, बाजार समित्या, दूध संघ, शिखर संस्था अशा मोठ्या सहकारी संस्था, तसेच सहकारी नागरी बँका, क्रेडिट सोसायटी, अशा ब वर्गातील १३ हजार ८५ संस्था आहेत. तसेच छोट्या क्रेडिट सोसायटी, गृहनिर्माण संस्था, छोटे दूध संघ अशा क वर्गातील १३ हजार ७४ आणि ग्राहक संस्था, कामगार संस्था अशा ड वर्गातील २१ हजार संस्था अशा एकूण ४७ हजार निवडणुका रखडल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- बीडमध्ये दहावी, बारावी वगळता सर्व शाळा बंद
- हिंगोलीत आणखी २७ अहवाल पॉझिटिव्ह; शहरात १२ कंटेनमेंट झोन जाहीर
- हर्सूल तलावात आत्महत्येचा प्रयत्न; सुरक्षा रक्षकाच्या सतर्कतेमुळे वाचला जीव
- काँग्रेस नेते राहुल गांधींनी लुटला केरळमध्ये समुद्र सफारीचा आनंद
- ‘मांजर डोळे मिटून दूध पिते तरी जगाला ते दिसतेच केंद्र सरकारने हे विसरू नये’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
