🕒 1 min read
मुंबई : ‘राम अयोध्येचा राजा होता. त्याच्या मंदिरासाठी युद्ध झाले. शेकडो कारसेवकांनी आपले रक्त सांडले. बलिदान दिले. त्या अयोध्येच्या रामाचे मंदिर वर्गणीतून बांधायचे? असा परखड सवाल शिवसेनेनं उपस्थितीत केला आहे. तसंच,’श्रीरामाचे भव्य मंदिर हे एखाद्या राजकीय पक्षाच्या राजकीय लाभासाठी बनत नसून ते देशाच्या हिंदू अस्मितेची पताका फडकविण्यासाठी बांधले जात आहे. चार लाख स्वयंसेवक हे मंदिराच्या वर्गणीनिमित्ताने संपर्क अभियान राबविणार आहेत. हे संपर्क अभियान म्हणजे रामाच्या आड 2024चा निवडणूक प्रचार आहे. रामाच्या नावाचा राजकीय प्रचार केव्हा तरी थांबवायलाच हवा’ असा सल्लावजा टोला सामनामधून भाजपला लगावला आहे.
दरम्यान,भाजपने जोरदार प्रत्युत्तर देत शिवसेनेवर शरसंधान केले आहे. भाजप प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी शिवसेनेला चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. रामाचे मंदिर वर्गणीतूनच होणार, खंडणीतून नव्हे !असं म्हणत कुळकर्णी यांनी शिवसेनेला चिमटा काढला आहे.
कुलकर्णी म्हणाले, संजय राऊत, उद्धव ठाकरे आणि पर्यायाने सेनेवर लवकरच हे राम ! म्हणण्याची वेळ येणार असेच दिसते आहे. ज्यांना वर्गणी माहीतच नाही. खंडणीवरच ज्यांना विश्वास आहे. त्यांना वर्गणीचे महत्व कसे कळणार ? त्यामुळे राम मंदिरासाठी चटकन खंडणी वसूल करून मोकळे व्हावे, असे संजय राऊत यांना वाटणे स्वाभाविक. पण ते राम मंदिर आहे. कोण्या पक्षप्रमुखाची संपत्ती नाही. राम मंदिर लोकवर्गणीतूनच होणार. खंडणीतून नव्हे !
कुलकर्णी म्हणाले, न वाचल्या जाणाऱ्या सामना मधून आज संजय राऊत यांनी पुन्हा आपल्या अक्कलचे तारे तोडले आहेत. लोकवर्गणीतून राम मंदिर बांधले जाणे हे सेनेच्या जिव्हारी लागणे स्वाभाविक आहे. सोनियांच्या पावलांनी बाराची मती वापरून महाराष्ट्रात सत्ता हस्तगत केल्यानंतर सेक्युलर सेनेला वारंवार आपल्या आकांना खुश करावेच लागणार ! थोडाही शब्द चुकला की दिल्लीश्वरांकडून फर्मान सुटणार आणि बापलेकांना हात रुमालात गुंढाळून, माना झुकवून कुर्निसात करावा लागणार ! वडिलांना दिलेला सत्तेचा शब्द पाळण्यासाठी हे करावेच लागणार. सुडाचा प्रवास सोपा नसतो. राष्ट्रीय अस्मितेचे सर्वोच्च प्रतीक असलेले मर्यादा पुरुषोत्तम, धर्मरक्षक राजा रामचंद्र राष्ट्रीय राजकारणाचा विषय होऊ नये, असे सेक्युलर सेनेला वाटणे स्वाभाविक आहे. बरं विकासावर राजकारण झालं पाहिजे हे सांगतात कोण, तर जे स्वतःच विकासकामांमध्ये मोठा अडसर बनले आहेत. स्थगित्यां पलिकडे ज्यांनी काहीच करून दाखवले नाही. ज्यांचा राजकीय प्राणवायू केवळ आणि केवळ भाजपाद्वेष आहे. नरेंद्र मोदीजी, अमित शहा आणि फडणवीस यांच्यावर तोंडसुख घेऊन आपली अकार्यक्षमता लपू शकते असे ज्यांना वाटते. ते विकासाच्या गप्पा मारतात हे हास्यास्पद आहे.
ज्यांच्या मुळे शिवसेना आहे, त्यांचे स्मारक बांधू न शकलेले, ज्यांच्या नावावर पक्ष आहे त्या छत्रपतींचे स्मारक अडवून बसलेले निर्लज्जपणे नाकाने कांदे सोलतात, हा बेशरमपणाचा कळस आहे . श्रीरामजन्मभूमीवर राम मंदिर उभे व्हावे म्हणून केवळ भारतातीलच नव्हे तर जगातले हिंदू आपला खारीचा वाटा उचलण्यासाठी आतुर आहेत. धर्मरक्षक राजा राम हा राष्ट्रीय राजकारणाचा विषय होऊ नये असे शिवसेनेला वाटते. तुमच्या वाटण्याची कोणाला तमा आहे ? श्रीराम हा राष्ट्रीय अस्मितेचा विषय नव्हता म्हणूनच तर छद्म धर्मनिरपेक्षता बोकाळली. मतपेटीसाठी अनुनयाचे राजकारण झाले. तुम्ही पहिले इतर राज्यांमध्ये नोटापेक्षा जास्त मते मिळवण्यासाठी प्रयत्न करा. महाराष्ट्रात जे हाती लागले ते टिकवण्याचा प्रयत्न करा. जनता धडा शिकवण्याच्या तयारीत आहे. अजूनही सावरा नाही तर अग्रलेखात उल्लेखिल्या प्रमाणे हे राम !म्हणण्याची वेळ आल्यावाचून राहणार नाही असं देखील ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- मालमत्ता खरेदीदारांना खुशखबर ! मुद्रांक शुल्कामधील सवलत चार महिन्यांनी वाढली…
- मतदारसंघातील बिनविरोध होणाऱ्या ग्रामपंचायतींना 25 लाखांचा निधी देणार- देवेंद्र भुयार
- पंतप्रधान मोदींच्या ‘मन की बात’च्या वेळी थाळीनाद करा, शेतकऱ्यांचे आवाहन
- ‘नव ब्रिगेडी बाटग्याना राम वर्गणीच्या नावाने करपट ढेकर आले नसते तरच आश्चर्य होते’
- भाजपने प.बंगालमध्ये दोन अंकी जागा जिंकल्या तर मी ट्विटर वापरणं सोडून देईन : प्रशांत किशोर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
