औरंगाबाद: शहरातील पुंडलिकनगर भागातील लग्नसमारंभातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाचगाणी सुरु असतांना अचानकच काही तरुणांनी हातात तलवारी आणि जांबिया घेऊन डान्स करायला सुरुवात केली. आजूबाजूला असलेल्या उत्साही लोकांनी यामध्ये नवरदेवालाही ओढले. आणि मग काय नवरदेव देखील हातात तलवार घेऊन बेधुंद होऊन थिरकू लागला. अति उत्साही लोकांनी याचा व्हिडिओ काढत तो सोशल मिडियावर टाकला देखील, आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून पोलीस पोहोचले थेट नवरदेवापर्यंत. आता पोलिसांनी नवरदेवासह नाचणाऱ्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. ही हुल्लडबाजी तरुणाला अशी भोवली की लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी कोठडीत जावे लागले.
पुंडलिक नगर परिसरातील रेणुकानगर याठिकाणी बिभीषण अनिल शिंदे याच्या लग्नाच्या हळदीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी नवरदेव आणि त्याच्या मित्रांनी तलवार आणि जांबिया घेऊन डान्स करायला सुरुवात केली. आधी नवरदेवाचे मित्र तलवार घेऊन डान्स करत होते. त्यानंतर त्यांनी नवरदेवाला ही सहभागी करून घेतले. डीजेच्या तालावर बेधुंद झालेल्या तरुणांना आजूबाजूचे भान राहिले नाही. त्यातच सोबतच्यांनी या डान्सचा व्हिडिओ करून तो सोशल मीडियावर टाकला. व्हिडिओ व्हायरल झाला. आणि पोलिसांपर्यंत पोहोचला.
त्यानंतर लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नवरदेवाला जेलमध्ये जावे लागले आहे. हातात तलवार घेऊन नाचणाऱ्या मित्रांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्या सर्वांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना एक दिवसाची कोठडी सुनावली आहे. यामध्ये बिभीषण शिंदे नवरदेव तर त्याचे मित्र यश साखरे, शेख बादशाह, शुभम मोरे, किरण रोकडे, आणि वसीम शेख हे सर्व राहणार रेणुका नगर अशी आरोपींची नावे आहेत. पुंडलिक नगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिलीप गांगुर्डे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शेषराव खटाणे यांच्या पथकाने ही कारवाई पार पाडली.
महत्त्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
