अमरावती : जागतिक प्रेमदिनाच्या दिवशीच अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे येथील महिला आणि कला महाविद्यालयात एक अजबगजब प्रकार घडला आहे. या महाविद्यालातील विद्यार्थिनींना ‘व्हॅलेंटाईन्स डे’च्या निमित्ताने प्रेमविवाह आणि हुंडा घेऊन लग्न न करण्याची शपथ देण्यात आली आहे. विशेष म्हणजे शिक्षकांनीच या विद्यार्थीनीना हि शपथ दिली आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यभरातून या घटनेवर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.
याच पार्श्वभूमीवर महिला आणि बालकल्याणमंत्री यशोमती ठाकूर यांनी समर्थन केले आहे. याबाबत त्या अमरावती येथे माध्यमांशी बोलत होत्या. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, ‘शपथेच्या माध्यमातून विद्यार्थीनींनी जनजागृतीचीचा प्रयत्न करत होत्या आणि कोणी काय शपथ घ्यावी, हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे असे विधान यशोमती ठाकूर यांनी केले,’ असे ते म्हणाले.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या, ‘विद्यार्थीनीना जर वाटत असेल की शपथ घेतल्याने संरक्षण होत असेल तर त्यांनी शपथ घेतली असावी, असेही महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या. तसेच भाजपकडून यावर तीव्र प्रतिक्रिया आली आहे
दरम्यान, भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ट्वीट करत त्यांनी याबाबत आक्षेप नोंदविला आहे. ‘अमरावतीतील चांदुर येथील शाळेत मुलींना प्रेम आणि प्रेम विवाह न करण्याची शपथ हा कमालीचा विचीत्र प्रकार घडला. शपथ मुलींनाच का? आणि ती ही प्रेम न करण्याची. ‘मुलींपेक्षा मुलांनी शपथ घ्यायला पाहिजे की एकतर्फी प्रेमातून मुलींना त्रास देणार नाही, कोणावर ऍसिड फेकणार नाही, जिवंत जळणार नाही, वाकड्या नजरेने बघणार नाही आणि जर कोणी बघितलं तर त्याला जबरदस्त जवाब देणार.. असेही त्यांनी आपल्या ट्वीट मध्ये म्हंटले आहे.


