मुंबई : हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या सुपरनोव्हासने महिला टी-२० चॅलेंज स्पर्धेच्या (Women’s T20 Challenge 2022) पहिल्या सामन्यात ट्रेलब्लेझर्सला (TBL vs SNO) ४९ धावांनी मात दिली आहे. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात सुपरनोव्हासची कप्तान हरमनप्रीत कौरने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. हेली मॅथ्यूजच्या दमदार गोलंदाजीच्या जोरावर ट्रेलब्रेझर्सने सुपरनोव्हासला २० षटकात १६३ धावांवर रोखले. सुपरनोव्हाससाठी कप्तान हरमनप्रीत कौरने सर्वाधिक ३७ धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात स्मृती मंधानाच्या ट्रेलब्रेझर्सचे फलंदाज मैदानावर जास्त काळ टिकले नाही. सुपरनोव्हासकडून पूजा वस्त्राकरने ४ बळी घेत ट्रेलब्रेझर्सला २० षटकात ९ बाद ११४ धावांपर्यंत थांबवले.
ट्रेलब्लेझर्सचा डाव
सुपरनोव्हासच्या आव्हानाचा पाठलाग करताना कप्तान स्मृती मंधाना आणि हेली मॅथ्यूज यांनी संयमी सुरुवात केली. या दोघांनी पहिल्या गड्यासाठी ३९ धावा केल्या. पूजा वस्त्राकरने ट्रेलब्लेझर्सला सुरूंग लावला. तिने मॅथ्यूज (१८) आणि नंतर मंधानाला (३४) बाद केले. जेमीमा रॉ़ड्रिग्जने (२४) थोडा प्रतिकार केला, पण तीसुद्धा १४व्या षटकात माघारी परतला. मंधाना बाद झाल्यानंतर ट्रेलब्लेझर्सची घसरगुंडी उडाली. शर्मीन अख्तर, अरुंधती रेड्डी आणि सलमा खातून यांना खातेही उघडता आले नाही. पुजा वस्त्राकरने आपल्या ४ षटकात १२ धावा देत ४ बळी टिपले. २० षटकात ट्रेलब्लेझर्सला ९ बाद धावांपर्यंत पोहोचता आले.
Massive 49 Run Victory for Harmanpreet Kaur's Supernovas in Match 1 of Women's T20 Challenge 2022????????#CricketTwitter pic.twitter.com/pAg2xeL2Pq
— Female Cricket (@imfemalecricket) May 23, 2022
सुपरनोव्हासचा डाव
डिआंड्रा डॉटिन आणि प्रिया पुनिया या सलामीवीरांनी सुपरनोव्हासला अर्धशतकी सुरुवात करून दिली. डॉटिनने आक्रमक फटके खेळले आणि ५ चौकार आणि एका षटकारांसह ३२ धावा केल्या. चोरटी धाव घेण्याच्या नादात तिला शर्मीन अख्तरने धावबाद केले. पुनियाही (२२) जास्त वेळ मैदानावर टिकू शकली नाही. हेली मॅथ्यूजने तिचा त्रिफळा उडवला त्यानंतर आलेल्या हरलीन देओलेनेही जलद ३५ धावा केल्या. संघाचे शतक फलकावर लावून ती तंबूत परतली. बांगलादेशची अनुभवी खेळाडू सलमा खातूनने तिला बाद केले. कप्तान हरमनप्रीत कौरने संयमी फलंदाजी केली. तिने ४ चौकारांसह ३७ धावा केल्या आणि संघाला दीडशेपार पोहोचवले. १९व्या षटकात ती धावबाद झाली. हेली मॅथ्यूजने टाकलेल्या शेवटच्या षटकात सुपरनोव्हासला तीनच धावा घेता आल्या. २० षटकात सुपरनोव्हासने सर्वबाद १६३ धावा केल्या. ट्रेलब्रेझर्सकडून मॅथ्यूजने सर्वाधिक ३ बळी घेतले.
दोन्ही संघांची Playing 11
ट्रेलब्लेझर्स – स्मृती मंधाना (कप्तान), जेमिमा रॉड्रिग्स, पूनम यादव, हेली मॅथ्यूज, सोफिया डंकले, राजेश्वरी गायकवाड, अरुंधती रेड्डी, सलमा खातून, रेणुका सिंग, रिचा घोष (यष्टीरक्षक), शर्मीन अख्तर.
सुपरनोव्हास – डिआंड्रा डॉटिन, प्रिया पुनिया, सुन लुस, हरमनप्रीत कौर (कप्तान), हरलीन देओल, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), सोफी एक्लेस्टोन, अलाना किंग, व्ही. चंदू, पूजा वस्त्राकर, मेघना सिंग.
महत्त्वाच्या बातम्या –

