टीम महाराष्ट्र देशा : मंत्रीपद मिळाल्यानंतर बच्चू कडूंनी त्यांच्या पद्धतीने काम करायचं सुरु केलं आहे. सर्व सामान्य नागरिकांच्या फाईली जर का अधिकाऱ्यांकडून दाबल्या गेल्या तर त्या अधिकाऱ्याची सर्व्हिस थांबेल, अशा शब्दात महिला आणि बालकल्याण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अधिकाऱ्यांना तंबी दिली आहे.
सातारा जिल्हा परिषदेत या विभागाची बैठक पार पडली. या बैठकीत सात दिवसांच्या वर तक्रारीची फाईल थांबली तर अधिकाऱ्यांना कारवाई होणार असल्याचं बच्चू कडूंनी स्पष्ट केलं. बैठकीनंतर बच्चू कडू यांनी पत्रकारांशी चर्चा केली.
यावेळी ते म्हणाले, ‘महाराष्ट्रात मला कायदेशीर कारवाई करण्यापासून अडवणारा कोणी तयार झाला नाही. माझं मंत्रिपद जाईल पण लोकांना मदत करण्यासाठी कोणी आडवे येत असेल तर त्याला मी खपवून घेणार नाही, असा दम बच्चू कडू यांनी अधिकाऱ्यांना भरला आहे.
दरम्यान, राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मंत्रीपदाचा कार्यभार स्विकारण्यापूर्वी आपल्या कार्यकर्त्यांसह मंत्रालयाजवळील महात्मा गांधी यांच्या पुतळयासमोर रक्तदान केलं. हे रक्त थँलेसेमिया रुग्णांना दिले जाणार आहेत. आता तर हातात दंडुका आला असल्यानं तीच आक्रमकता कायम राहिल, परंतु कायदेशीर मार्गाने प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे यावेळी बच्चू कडू यांनी सांगितले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
