औरंगाबाद : शहराचा ऐतिहासिक वारसा असलेल्या सलीम अली सरोवरातील पाण्यात हजारो मासे मृत्यूमुखी पडल्याचा प्रकार रविवारी समोर आला. पाण्यातील प्रदूषणामुळे हा प्रकार घडला असावा, असा अंदाज प्रथमदर्शनी मांडला जात आहे. तथापि, सोमवारी (दि.२२) महापालिका व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्यांनी येथे पाहणी केली. मृत माशांचे नमुने विद्यापीठाच्या झुऑलोजी विभागात पाठवले असून पाण्याच्या नमुन्यांची तपासणी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून केली जात आहे.
काही वर्षांपूर्वी पालिकेने सलीम अली सरोवरात जाणारे दूषित पाणी शुद्ध करून सरोवरात सोडण्यासाठी येथे एसटीपी प्लांट सुरू केला आहे. यावर सुमारे पाच कोटींचा खर्च केला आहे. हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर ड्रेनेजचे पाणी शुद्ध होऊनच सरोवरात जात असल्याचा दावा पालिकेने केला.
मात्र तरीही सलीम अली सरोवरातील पाणी वारंवार दूषित होत आहे. सरोवरातील हजारो मासे मृत्यूमुखी पडल्याचे प्रकार वारंवार समोर येत आहे. गतवर्षी देखील मासे मेल्याचा प्रकार समोर आला होता. आता रविवारी पुन्हा मृत मासे पाण्यावर तरंगत असल्याचे समोर आले.
सोमवारी पालिकेचे मुख्य पशुसंवर्धन अधिकारी बी.एस. नाईकवाडे, उपअभियंता अशोक पद्मे, चांडक यांच्यासह प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्यांनी पाहणी केली. याबाबत डॉ. नाईकवाडे यांनी सांगितले की, मृत माशांचे नमुने विद्यापीठातील झुऑलोजी विभागात पाठवले आहेत.
या तपासणीत माशांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? हे समोर येईल. याचवेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्यांना देखील पाण्याचे नमुने घेतले असून त्यांचाही अहवाल येईल.
सरोवरातील मृत माशांच्या दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे हे मृत मासे तलावातून बाहेर काढून पुरून या माशांची विल्हेवाट लावण्याच्या सूचना संबंधित अधिकार्यांना केल्याचे शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी स्पष्ट केले.
महत्त्वाच्या बातम्या
- बेड्सची संख्या वाढवली पण अडवणूकीच्या मानसिकतेचे काय ?
- उतार वयात इतकी बेइज्जती कुणाची होऊ नये; भाजप नेत्याचा घणाघात
- मिरची व्यापाऱ्याने जयंत पाटील यांना फसवले!
- ‘या’ कारणामुळे खासदार गिरीश बापट यांनी लिहले पंतप्रधान मोदींना पत्र
- ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण होणार केंद्रीय मंत्री जावडेकरांची माहिती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

