मुंबई : काँग्रेसचे मातब्बर नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी कॉंग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजप मध्ये प्रवेश केल्यामुळे मध्य प्रदेशात राजकीय भूकंप झाला आहे. शिंदेंसोबत १८ ते २० आमदारांचा एक गटही फूटून बाहेर पडल्याने मध्य प्रदेशातील कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकारही अडचणीत आले आहे.
याच पार्श्वभूमीवर ‘महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्रास देत आहेत. त्यामुळे ते नाराज असून ते लवकरच परत येतील आणि राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होईल,’ असं विधान केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं होत.
यानंतर आता शरद पवार यांनी काळजी करण्याचे काहीच कारण नाही असे सांगितले आहे. मध्य प्रदेशात जे काही घडते तसे महाराष्ट्रात काहीही घडणार नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना अशी महाविकास आघाडी होऊन राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सत्तेवर आलेले सरकार आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. शरद पवार यांनी केलेल्या या विधानामुळे राज्यातील सरकारच्या भवितव्याबाबत उपस्थित होत असलेल्या शंकांना पूर्णविराम मिळाला आहे असे म्हणायला आता काही हरकत नाही.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
