🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात महाराष्ट्र दिनाला गालगोट लागले असून बुधवारी माओवाद्यांनी सी-६० कमांडो जवानांच्या ताफ्यावर आयईडी स्फोटकांद्वारे भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात १५ जवान शहीद झाले आहे. माओवाद्यांनी केलेल्या या भ्याड हल्ल्याचं सर्व स्तरातून तीव्र शब्दांमध्ये निषेध व्यक्त केला जात असतानाच माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी भाजप सरकारच्या नक्षलवाद व दहशतवादाविरोधातील मवाळ भूमिकेचाच हा परिणाम असल्याचा घणाघाती आरोप केला आहे.तर केंद्रातील मोदी सरकार असो व राज्यातील फडणवीस सरकार,दोन्हीही फक्त मोठ-मोठ्या गप्पा मारण्यातच पटाईत असल्याचा घणाघात त्यांनी केला आहे.
यावेळी चव्हाण म्हणाले की, महाराष्ट्रात गृहखाते सांभाळणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या पदावर राहण्याचा नैतिक अधिकार राहिलेला नाही. नक्षलवाद्यांनी एवढा मोठा हल्ला करेपर्यंत गृहविभाग काय करत होता? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था हाताळण्यात फडणवीस अपयशी ठरले आहेत, त्यांनी तत्काळ गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना सरकारने प्रत्येकी 50 लाख रुपयांची मदत द्यावी, अशी मागणीही चव्हाण यांनी केली आहे.
केंद्रातील मोदी सरकार असो व राज्यातील फडणवीस सरकार,दोन्हीही फक्त मोठ-मोठ्या गप्पा मारण्यातच पटाईत आहेत. या सरकारच्या काळात देशात अतिरेकी व नक्षलवाद्यांचे हल्ले वाढले. पण भाजपाला त्याचे काहीही पडलेले नाही. फक्त प्रचारसभेतच घरात घुसुन मारण्याच्या फुशारक्या मारण्यात भाजपवाले पटाईत आहेत. असा टोला देखील चव्हाण यांनी यावेळी मारला आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

