पुणे: पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन शहरातील दोन मेट्रो मार्गिकांचे उद्घाटन पार पडले आहे. पुणे मेट्रोला हिरवा कंदील दाखवल्यानंतर मोदींनी मेट्रोने प्रवास देखील केला. प्रवासाआधी मोदींनी मेट्रोचे तिकीट काढत पुणे मेट्रोचे पहिले प्रवासी होण्याचा मान मिळवला. यानंतर मोदी एमआयटी कॉलेजच्या मैदानावर आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले. त्यावेळी त्यांनी भाषणही केले. यावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांचे आभार मानत महाराष्ट्रातील आणखी प्रकल्प आपल्या माध्यमातून पूर्ण व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली.
या कार्यक्रमात बोलताना फडणवीस म्हणाले, “पुण्यासाठी आजचा दिवस स्वप्नपूर्तीचा दिवस आहे. आज पुण्याची मेट्रो धावली आहे. या मेट्रोचं पहिलं तिकीट खुद्द पंतप्रधानांनी मोबाईलवर पेमेंट करून काढलं आहे. आम्ही मात्र विनातिकिट प्रवास केल्याने आम्हाला संकोच वाटत आहे. त्यामुळे आता मी मेट्रोवाल्यांना सांगणार आहे की आमच्याकडून देखील तिकिटाचे पैसे वसूल करुन घ्या. महामेट्रोने विक्रमी वेळामध्ये पुणे मेट्रोचे काम पूर्ण केले आहे. पुण्यात मुळा मुठा नदी स्वच्छ करण्यासाठी आपण प्रकल्प मंजूर केला आहे, त्याचेही आज भूमीपूजन होत आहे. त्यासाठी मी पंतप्रधान मोदींचे आभार मानतो. महापालिकेने केलेली कामे उत्तम आहेत. कारण त्यामागे पंतप्रधान मोदींचे सरकार ताकदीने उभे राहिले. मोठे प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर पुणे शहर बदलत आहे. येत्या काळात चांगली वाहतूक व्यवस्था असलेले शहर म्हणून पुणे शहर आपल्याला पाहायला मिळेल.”
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

