टीम महाराष्ट्र देशा – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येत रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी दाखल झाले आहेत. रामलल्लाचे दर्शन घेण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी शिवसेनेकडून १ कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली. तसेच, या ठिकाणी महाराष्ट्रातील रामभक्तांसाठी महाराष्ट्र भवन निर्मितीचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, शिवसेना खासदार संजय राऊत उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. ‘ भाजपचा अर्थ हिंदुत्त्व नाही आम्ही भाजपपासून वेगळे झालो आहोत. हिंदुत्त्वापासून नाही’. असे म्हणत त्यांनी भाजपला सणसणीत टोला लगावला. तसेच अयोध्येत जाणाऱ्या भाविकांसाठी अयोध्येत महाराष्ट्र भवनाच्या उभारणीसाठी जागा द्यावी, अशी विनंतीही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे केली.
सुधीर मुनगंटीवारांचा शिवसेनेला टोला –
प्रभू श्री रामाचा १६१ आमदारांचा प्रसाद जनतेच्या माध्यमातून शिवसेना आणि भाजपला प्राप्त झाला होता. शिवसेनेचा आत्ताचा प्रसाद हा श्री रामाचा कसा असू शकतो ? कारण प्रभू श्री राम एक वचनी आणि ‘प्राण जाये पार वचन न जाये’ असे होते. सत्तेवर प्रेम करणाऱ्या प्रभू रामचंद्राच चित्र आम्ही बघितलं नाही. एका वचनासाठी १४ वर्ष वनवास भोगणारे श्री राम आमच्या लक्षात आहेत.
त्यामुळे रामाचा हा प्रसाद आहे म्हणायचं कि चूक झाली म्हणून श्री रामाच्या चरणी मान्य करायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे असा टोला माजी अर्थमंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेला लगावला आहे.
चंद्रकांत पाटलांची टीका –
‘शिवसेनेला अयोध्येला जाऊन त्याचं आणि प्रभू श्री रामाशी असलेल नातं दाखवावं लागतं. आम्हाला त्याची गरज नाही. आत फाडलं तर सगळं तेच आहे’ अश्या शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौर्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

