मुंबई : कोरोनाचे संकट हे जागतिक संकट आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार, विविध सामाजिक संघटना आणि व्यक्ती प्रत्येक जण आपआपल्या परीने या संकटावर मात करण्याचा आटोकाट प्रयत्न करतो आहे. भारतीय जनता पार्टीने सुद्धा या संकटकाळी प्रत्येक गरजूला मदत पोहोचविण्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. आपल्या सामूहिक संघटनशक्तीतून या संकटात आपण सारे निश्चितपणे विजयी होऊ, असे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
भाजपा किसान मोर्चाचे पदाधिकारी, राज्यातील भाजपाचे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य, जिल्हाध्यक्षांशी आज देवेंद्र फडणवीस यांनी ‘ऑडिओब्रीज’च्या माध्यमातून संवाद साधला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, विजयराव पुराणिक या संवादसेतूमध्ये उपस्थित होते. ग्रामीण भागातून सुमारे 2000 कार्यकर्ते यात जोडले गेले होते.
शेतकर्यांचा भाजीपाला, फळे आणि अन्य शेतमाल ग्राहकांपर्यंत पोहोचणे यासाठी करावयाचा समन्वय, ग्रामीण भागात सुद्धा सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन, ग्रामीण भागात अन्नधान्य आणि कुठल्याही सुविधेची कमतरता राहू नये, यासाठी समन्वय इत्यादींबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. रेशनदुकानांतून मिळणार्या धान्याबाबत परस्पर विसंगती असलेल्या आदेशांमुळे मोठ्या प्रमाणात तक्रारी ग्रामीण भागातून यावेळी मांडण्यात आल्या. ग्रामीण भागात सुद्धा नुकसान होत असल्याने त्याबाबत सुद्धा काही उपयुक्त सूचना त्यांनी केल्या. अनेकांच्या प्रश्नांना यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी उत्तरे दिली.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

