पुणे : सारथी संस्थेबाबत मंत्री विजय वडेट्टीवार हे चुकीची माहिती देऊन मराठा समाजाची दिशाभूल करीत आहेत. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन त्याठिकाणी दुसरा सक्षम मंत्री नेमावा आणि मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली त्वरित बैठक बोलवावी, अशी मागणी काल मराठा क्रांती मोर्चा पुणे जिल्ह्याच्या वतीने करण्यात आली आहे.
‘फडणवीस रोज कुठे ना कुठे फिरताहेत मात्र मुख्यमंत्री मातोश्रीच्या बाहेर पडायला तयार नाहीत’
सारथीची स्वायत्तता कायम रखण्याबाबत छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात आंदोलन झाल्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावतीने मंत्री एकनाथ शिंदे यांनी जो शब्द दिला, तो पाळावा अशीही मागणी मराठा क्रांती मोर्चाने केली आहे.
दरम्यान, यानंतर ‘सारथी संस्थेबाबत माझी भूमिका दुटप्पी आहे, असे आरोप केले जात आहे. पण मी सारथीबाबत कोणतीच नकारात्मक भूमिका घेतली नाही. मी ओबीसी समाजाचा नेता असल्यामुळे माझ्यावर हे आरोप केले जात आहे’ असं मत मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलं
तसंच, ‘या संस्थेची व्याप्ती वाढवण्याचा प्रयत्न मी केला आहे. तरीही माझ्यावर असे आरोप होत असेल तर मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून विनंती करणार की, राजकारण करत माझ्यावर आरोप होत असेल तर मला यातून मुक्त करा आणि माझ्या ऐवजी या पदाची जबाबदारी एखाद्या मराठा नेत्याला द्या’ असं स्पष्ट मत वडेट्टीवार यांनी व्यक्त केले.
मी पाहिलेले पवार वेगळे आहेत त्यांच्याविषयी बदनामीकारक गैरसमज पसरवले गेले – संजय राऊत
दरम्यान, आता या वादात मराठा सेवक समितीने वडेट्टीवार यांना पत्र लिहिले असून शेलक्या शब्दात जाब विचारला आहे. पाहूया मराठा सेवकांचे.विजय वडेट्टीवार यांना खुले पत्र
मा.ना. विजय वडेट्टीवारजी
सप्रेम जय शिवराय….
आपल्याला चालेल ना फक्त जय शिवराय म्हटलेलं कि सर्व महापुरुषांचा उल्लेख करू म्हणजे तुम्ही आम्हाला जातीयवादी समजणार नाहीत. आज तुमच्या वक्तव्यामुळे आमच्या सारख्या सर्व सामान्य मराठा सेवकांना अतिशय वेदना होत आहेत त्या शब्दात मांडणे कठीण आहे. पुरोगामी परंपरा सांगणाऱ्या राजकीय पक्षाचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही फुले-शाहू-आंबेडकरांची पुरोगामी परंपरा सांगणाऱ्या महाराष्ट्राच्या मंत्री मंडळात आहात शिवाय तुमचे खातेही बहुजन कल्याण विभाग !! राज्य मागास आयोगाच्या अहवालानंतर मराठा समाजाला आरक्षण देण्याकरिता सामाजीक व शैक्षणिक मागास प्रवर्ग निर्माण करण्यात आला व मराठा समाजाला शिक्षण व नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्यात आले. सामाजिक व शैक्षणिक मागास असल्याने हा प्रवर्ग आपण मंत्री असलेल्या बहुजन कल्याण विभागाच्या अखत्यारीत आला या प्रवर्गाच्या कल्याणासाठी सारथी सारखी संस्था छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने निर्माण करण्यात आली त्याचे पालकत्व या खात्याचे मंत्री म्हणून आपोआपच आपल्याकडे आले. आम्हीही ते खुल्या दिलाने स्वीकारले. यात आमच्या मनात त्याही वेळी कुठला जातीभेद नव्हता व आजही नाही. आम्ही आपणाकडे सातत्याने सारथी बाबत निवेदने देवून पाठपुरावा करत आहोत. जर आमच्या मनात आपल्या प्रवर्गाविषयी कुठलीही शंका असती तर सुरुवातीलाच आम्ही आपल्या राजीनाम्याची मागणी केली असती. परंतु आज आपण जातीबद्दल, प्रवर्गाबद्दल वक्तव्य करून आमच्या मनात तुमच्या विषयी शंका निर्माण केलीत असो…
मा. वडेट्टीवार साहेब..आजही आम्हाला तुमचा राजीनामा नको आहे फक्त आमच्या मागण्या मान्य करा …कारण तुमच्या मंत्री पदापेक्षाही जास्त आम्हाला मराठा तरुणांचे भवितव्य महत्वाचे आहे ज्याचा गोंधळ तुमच्या कार्यकाळात वाढला आहे..
आम्हाला मान्य आहे सरकार सत्तेत येऊन फार कालावधी झालेला नाही त्यात गेली चार महिने संपूर्ण जगच कोरोनाशी लढत आहे.परंतु जग थांबलेलं नाही एका बाजूला आपल्या सरकारमधील सामाजिक न्याय विभाग इतर समाजासाठी अधिकच्या आर्थिक तरतुदी करीत आहे. विद्यार्थ्यांसाठी नवनवीन योजना आणत असताना आम्ही आपणाकडेप प्रत्यक्ष भेटून, इमेलद्वारे सारथीच्या आर्थिक तरतुदीबाबत, नवीन योजनांबाबत पाठपुरावा करत आहोत त्या अनुषंगाने आपणाकडून या सर्व पार्श्वभूमीवर काही कागदोपत्री खुलाश्याची अपेक्षा करत आहोत.
तुम्ही दिलेलं आश्वासन
सारथी स्वायत्ततेबाबत खा. छ.संभाजीराजेंच्या उपस्थीतीत आपणासोबत झालेल्या बैठकीमध्ये सारथी संस्थेला १५० कोटीची मागणी, सारथी स्वायत्त संस्था ठेवणार, नवीन योजना तयार करुण सारथी संस्थेची व्याप्ती वाढवणार, महिला आणि रोजगार निर्मिती बाबत योजना करत असताना समाजातील प्रतिनिधीसोबत चर्चा करुण निर्णय घेणार असे आश्वासन तुम्ही आम्हाला दिले होते. परंतु याच्या विपरीत निर्णय तुमच्याकडून झाले याबाबतच्या प्रश्नाची उत्तरे आपण द्याल का ?
सारथी संस्थेची स्वायत्तता काढून घेत असताना आपण प्रकल्प मंजूरी बाबत कालमर्यादा का निश्चित केली नाही? सारथी संस्थेच्या योजनाना बंदी घातली जाणार नाही असे आपण म्हणत आहात पण आपण फेलोशिपच्या विद्यार्थ्यांचे थकित मानधन देऊन ते सिद्ध का केले नाही? सारथीला मागील युती सरकारने ५० कोटी निधी दिला आघाडी सरकारने देखील ५० कोटी निधी मंजूर केला असे आपले म्हणणे आहे, परंतु युती काळात ओबीसी मंत्रालयासाठी १००० कोटीच्या निधीची तरतूद होती. आत्त्ताच्या आघाडी सरकारने त्या खात्याचे नामकरण करून तो निधी ३६५० कोटी केला आहे तरी मराठा समाजाला पर्यायाने एसईबीसी प्रवर्गाला त्यातील फक्त ५० कोटीच देणार का?
सारथी संस्थेचा मागील शिल्लक निधी परत कोणी पाठवला हे आपणास माहिती नाही आणि अशाप्रकारे निधी परत पाठवत असताना आपण सबंधीत अधिकाऱ्यांना जाब का विचारला नाही? ज्या गुप्ताना संचालक पदावरून हटवले त्याना परत अध्यक्ष पदाची जबाबदारी देत असताना कोणत्या सूचना केल्या व ध्येय उद्धिष्ठ पूर्ती बाबत कालमर्यादा ठरवून दिली का? याबाबत देखील स्पष्टीकरण आले पाहीजे.
सारथीचे माजी व्यवस्थापकीय संचालक परिहार यांच्या चौकशी बाबत आपण संस्थेला वेठीस धरत होता त्यांच्या चौकशीचा अहवाल अद्याप जाहीर का केला नाही? आपण सुरवातीच्या काळात ज्या धडाक्याने इतर समाजांच्या सोयी सुविधा बाबत निर्णय घेत होता तशा पद्धतीने मराठा समाजाबाबत आपण कोणता निर्णय घेतलाय? हे पुराव्या निशी जाहीर कराच.
सारथी स्वायत्तता आणि राजकारण
मा.मंत्री महोदय युती काळात या संस्थेला स्वायत्तता होती हे लोकांना तुम्ही संस्था मोडकळीस आणल्यानंतर समजले. तुम्हाला जर सारथी बाबत जातीय राजकारण चालू आहे असे वाटत असेल तर, सारथीला भरीव निधी द्या , सारथी संस्थेचे संपूर्ण राज्यासाठी केवळ पुण्यात कार्यालय करून त्याचा कुंडीतला बोन्साय बनवू नका सारथीची विभागवार किंवा जिल्हानिहाय कार्यालये उभारून सारथीचा संपूर्ण महाराष्ट्रातील सामान्य मराठा तरुणांना सावली देणारा वटवृक्ष करा, तरुणांना उच्च शिक्षण, कौशल्य विकास, कोचिंग, शेती, महिला अशा सर्व गटांना न्याय देण्यासाठी नवीन योजना आणा तुम्हाला विरोध करणारे नक्कीच तोंडावर पडतील एवढं नक्की ! कि तूम्हाला फक्त स्वतःचा प्रवर्ग, जात सांगुन आमच्या मागण्यांना हरताळ फसायचा आहे व सहनाभूती मिळवायची आहे?. आपल्या कृतीतून आपण मराठा समाजाच्या बाबत आकसपूर्ण भूमिका घेत नाही हे जर आपण सिद्ध केलेत तर मराठा समाज तुम्हाला निश्चितच डोक्यावर घेईल अन्यथा मराठा समाजाच आपणास कदापी माफ करणार नाही. आपण योग्य निर्णयाने आपले कर्तृत्व सिद्ध करावे एवढी माफक अपेक्षा.
या सर्व प्रश्नांचे स्वआकलन करून पुराव्यानिशी माहिती समाज माध्यमाद्वारे समाजापुढे मांडावी ही माफक अपेक्षा. राजकीय व जातिवादी वक्तव्य करुण आपण सामाजिक वातावरण कलुषित करण्यापेक्षा सर्व घटकाना न्याय देण्याची भूमिका घ्यावी समाज नक्कीच आपल्या कामाचा गैरव करेल. सर्वपक्षीय नेत्यांकडून राजकारणात मराठ्यांचा बळी देण्याचे थांबले पाहीजे एवढी माफक अपेक्षा समाज करत आहे व याचा सर्वच नेत्यांनी विचार करायला हवा.
– मराठा सेवक समिती, महाराष्ट्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

