औरंगाबाद : मराठवाडा जनता विकास परिषदेच्या वतीने मराठवाड्यातील रेल्वे प्रश्नांसंबंधी आयोजित बैठकीत मराठवाड्यातील सर्व खासदारांची एकजूट दिसून आली. आठ लोकसभा सदस्य आणि तीन राज्यसभा सदस्य रेल्वेच्या मुद्द्यावर एकत्र येऊन केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची भेट घेणार आहेत. रेल्वेशी निगडित रखडलेले विविध प्रश्न आणि महत्त्वाच्या योजनांना गती देण्यावर सर्व खासदारांचे एकमत झाले आहे.
मराठवाडा जनता विकास परिषदेच्या वतीने व्हिडिओ कॉन्फरंन्सिंग मिटींगमध्ये हिंगोलीचे नांदेडचे खा. प्रताप पाटील चिखलीकर, खा. हेमंत पाटील, परभणीचे खा. बंडू जाधव, लातूरचे खा. सुधाकर शृंगारे, राष्ट्रवादीच्या खा. फौजिया खान, राज्यसभा सदस्य डॉ. भागवत कराड, उमाकांत जोशी, मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष व्यंकटेश काब्दे आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या वतीने त्यांचे स्वीय सचिव ज्ञानेश्वर जाधव उपस्थित होते.
या प्रसंगी डॉ. भागवत कराड यांनी मराठवाड्याला झुकते माफ नको, मात्र, न्याय द्यावा, अशी भूमिका मांडली. तसेच मराठवाड्यावर कसा अन्याय होतो हे आपण आकडेवारीसह रेल्वेमंत्र्यांना पटवून देऊ, असे यावेळी डॉ. भागवत कराड म्हणाले. खा. फौजिया खान यांनीही अमरावती-अकोला-औरंगाबाद अशी नियमित गाडी सुरू करण्याची मागणी केली. तर उमाकांत जोशी यांनी राज्याने रेल्वेच्या कामासाठीच्या आपल्या हिश्श्याच्या निधीसंबंधी एक स्वतंत्र विभाग सुरू करावा, अशी मागणी केली.
दरम्यान, निजामाबादला सहा तास थांबणाऱ्या रायलसीमा एक्स्प्रेसचा विस्तार नांदेडपर्यंत करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. नांदेडचे खा. प्रताप पाटील चिखलीकर यांनी रेल्वेच्या विकासासाठी गोयल यांची भेट घेणार असल्यास दुजोरा दिला. तर लातूरचे खा. सुधाकर शृंगारे यांच्या वतीने श्यामसुंदर मानधना यांनी बल्लारशहा व लातूरला एकाच वेळी मंजूर झालेल्या पिटलाइनपैकी लातूरचे काम सुरू झाले नसल्याचे स्पष्ट केले. तेलंगण आणि आंध्रात चार नवीन रेल्वेलाइनचे काम सुरू असून विद्युतीकरणाचे कामही मोठ्या प्रमाणावर करण्यात आले असल्याचे काब्दे यांनी निदर्शनास आणून दिले.
महत्त्वाच्या बातम्या
- कोविड सेंटरमधून डिस्चार्ज देण्यासाठी डॉक्टरची महिलेकडे शरीरसुखाची मागणी
- घोडयावरून येण्यास तयार असलेल्या ‘त्या’ कर्मचाऱ्याचे पुन्हा एक पत्र, म्हणाला..
- औरंगाबादकरांनो काळजी घ्या! एकाच दिवसात वाढले ३७१ रुग्ण, ८ जणांचा मृत्यू
- महाराष्ट्र क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी औरंगाबादच्या प्रियंका गारखेडेची निवड
- ‘लाचारी करून मिळालेल्या सत्तेने लाटही येत नाही आणि ती टिकत ही नाही’


