🕒 1 min read
मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या गटात शिवसेनेचे ४० आमदार आहेत. याशिवाय काही खासदारही शिंदे यांच्या बाजूने असल्याचे सांगण्यात येत आहे. खासदारांच्या बंडाचे प्रकरण अद्याप उघडकीस आलेले नाही. दरम्यान या परिस्थितीत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेल्या आमदारांना पत्र पाठवून आभार व्यक्त करण्यात येत आहे. उद्धव ठाकरे यांनी आमदार राजन साळवी यांना पत्र लिहले आहे. एकनाथ शिंदे व त्यांच्या पाठिराख्यांचे शिवसेना बळकविण्याचे मनसुबे तुमच्यासारख्या निष्ठावंत शिवसैनिकांच्या पाठबळावर मी धुळीस मिळवणारच, असा इशारा देखील उद्धव ठाकरे यांनी पत्रातून दिला आहे.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
सध्याच्या विपरित घडामोडींच्या काळात तुम्ही शिवसेनेची असलेली आपली निष्ठा अभेद्य ठेवली. याबद्दल सर्वप्रथम शिवसेनेचा पक्षप्रमुख म्हणून मी व्यक्तिशः व शिवसेना पक्षाच्या वतीने तुम्हाला धन्यवाद देतो. विशेषतः 4 जुलै रोजी फुटीर शिंदे गटाच्या सरकारने मांडलेल्या विश्वासदर्शक प्रस्तावाला अनेक आमिषे व दबाव तंत्राचा वापर झाला असतानाही शिवसेना पक्षाने दिलेल्या आदेशाप्रमाणे तुम्ही ठाम विरोध केला. घटनेच्या दहाव्या परिशिष्टाच्या परिच्छेद 2 (1) (बी) खाली अपात्र होण्याची भीती दाखविली जात असताना शिवसेना पक्षाचे निर्देश झुगारुन देण्याचे फुटीरांचे डावपेच आपण जुमानले नाही याचा मला व तमाम शिवसैनिकांना सार्थ अभिमान वाटतो.
धन्यवाद साहेब……. pic.twitter.com/DOG2L7U8Xf
— Rajan Salvi (@MLARajanSalvi) July 12, 2022
शिवसेनेच्या ध्येय धोरणांवरील अढळ श्रद्धेपायी तुम्ही एकनाथ शिंदेच्या फाटाफुटीच्या डावपेचांना पुरुन उरलात व त्यांनी बनविलेल्या बेकायदेशीर सरकारला भीक घातली नाही किंवा अपात्र होण्याची भीती बाळगली नाही.
एकनाथ शिंदे व त्यांच्या पाठिराख्यांचे शिवसेना बळकविण्याचे मनसुबे तुमच्यासारख्या निष्ठावंत शिवसैनिकांच्या पाठबळावर मी धुळीस मिळविणारच हे अभिवचन आज आपल्याला देत आहे. शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेबांनी स्थापन केलेली ही बलाढ्य शिवसेना आपण सर्वजण मिळून पुढील काळात अधिक उंचीवर नेऊ असा विश्वास व्यक्त करुया.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
