🕒 1 min read
औरंगाबाद- औरंगाबादमध्ये शुक्रवारी मध्यरात्री दोन गटात झालेल्या वादामुळे तणाव निर्माण झाला. शहरातील काही भागांमध्ये जाळपोळ, दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. गांधीनगर, मोती कारंजा, रोजा बाग या भागात तणाव निर्माण झाला. या घटनेनंतर शहरातील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून जालन्याहून अतिरिक्त कुमक मागवल्याचे समजते. दगडफेकीत २५ जण जखमी झाले असून यात पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

जमावाने तलावरी, चाकू , लाठ्या-काठ्यांसह जमावाने तुफान दगडफेक केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत पोलीस, नागरिक मोठ्या प्रमाणात जखमी झाले आहेत. दोन्ही गटातील लोकांनी वाहनांची, दुकांनाची तोडफोड-जाळपोळ केली. दरम्यान, जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी गोळीबार करावा लागला. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे, जमावानं केलेल्या दगडफेकीत सहायक पोलीस आयुक्त गोवर्धन कोळेकर, क्रांती चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांच्यासह 10 पोलीस जखमी झाले आहेत. या दंगलीत ७० वर्षांची दिव्यांग व्यक्ती वेळीच बाहेर पडू न शकल्याने त्याचा मृत्यू झाला. तर दंगलखोरांना काबूमध्ये आणण्यासाठी केलेल्या गोळीबारात एका तरुणाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मोतीकारंजा परिसरात अनधिकृत नळ कनेक्शन तोडण्याची मोहिम गुरुवारपासून सुरु केली आहे. पहिल्या दिवशी या भागातील एका धार्मिकस्थळाचे नळ कनेक्शन तोडण्यात आले होते. तेव्हा एका गटाने दुसऱ्या एका धार्मिकस्थळाचे नळ कनेक्शन तोडण्याची मागणी केली. यावरुन मनपाच्या अधिकाऱ्यांनी दुसऱ्या धार्मिक स्थळाचे नळ कनेक्शन काल तोडले. याच कारणावरुन दोन गट शुक्रवारी सायंकाळी भिडले. एका गटाने मोतीकारंजा रोडवरील दिसेल त्या दुकानांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. यात दुकानांबाहेर असणाऱ्या कूलर, सामानासह गाड्यांची तोडफोड, जाळपोळ सुरु केली. हे पाहून दुसरा गटही रस्त्यावर उतरला. दोन्ही बाजूकडील सात ते आठ हजारांचा जमाव रस्त्यावर उतरला होता. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस तयारीनिशी घटनास्थळी दाखल झाले. मात्र पोलिसांच्या वाहनावरच दगडफेक करण्यात आली.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

