🕒 1 min read
पुणे : पुणे स्टेशन परिसरातील फूटपाथवर आईसमोर झोपलेल्या अडीच वर्षांच्या मुलीला मंगळवारी पहाटे उचलून नेऊन तिच्यावर रेल्वेच्या बोगीत बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बेशुद्ध अवस्थेत सापडलेल्या चिमुकलीला ससूनमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान संध्याकाळी तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
पुणे स्टेशन परिसरातील फुटपाथवर आईसह झोपलेल्या चिमुरडीला अज्ञात नराधमाने उचलून नेले. त्यानंतर तिच्यावर रेल्वेच्या डब्यात पाशवी बलात्कार केला व तिला जखमी अवस्थेत सोडून पसार झाला. दरम्यान सकाळी आठ वाजता पोलिसांना ही चिमुरडी जखमी अवस्थेत सापडली. तिला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. या संतापजनक घटनेनंतर संपूर्ण पुणे शहर हादरले आहे.
पीडीत मुलीचे आई-वडील पुणे स्टेशन येथील मालधक्का चौकाजवळील फुटपाथवर राहतात. पीडीत मुलीची आई मुकबधिर आहे. लिंबू, मिरची, खेळणी विकून आपला उदरनिर्वाह करतात. सोमवारी रात्री ती मालधक्का चौकातील फुटपाथवर मुलीसह झोपली होती. मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास अनोळखी इसमाने मुलीला उचलून नेवून हे कुकर्म केले.
पुणे रेल्वे स्थानक परिसरात गस्त घालत असताना लोहमार्ग पोलिसांना रेल्वेच्या डब्यामध्ये मुलगी बेशुद्धावस्थेत आढळून आली. तिच्या अंगावर जखमा आढळून आल्या. पोलिसांनी त्वरित तिला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तिच्या पालकांचा शोध घेण्यास सुरुवात केली असता, मालधक्का चौकात मुलीच्या आई-वडिलांनी मुलीचे छायाचित्र ओळखले. मुलीवर उपचार सुरु असल्याचे सांगितले मात्र दुर्दैवाने उपचार सुरू असताना संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास या मुलीचा मृत्यू झाला.
दरम्यान,याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून हे प्रकरण बंडगार्डन पोलिसांकडे वर्ग केलं आहे. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून तपास सुरू आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
