औरंगाबाद : दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे शहरात कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र या काळातही विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या कमी होतांना दिसत नाही. महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने १६ एप्रिलपासून रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांची अँटीजेन पद्धतीने कोरोना तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १६ एप्रिल पासून ते २२ एप्रिल पर्यंत मोबाईल व्हॅन पथकाद्वारे झालेल्या तपासणीत आत्तापर्यंत १४६८ जणांची अँटीजेन तपासणी झाली यात २७ जण पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती समोर आली आहे.
शहरात लॉकडाऊन काळातही विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्यांना पकडून अँटिजेन तपासणी करण्यात येत आहे. संबंधितांना लगेच विविध कोविड केअर सेंटर्समध्ये उपचारासाठी पाठवण्यात येत आहे. शहरात दररोज दिड हजारांच्या घरात कोरोना रुग्ण निघत आहेत. शहरातील अनेक भाग हॉटस्पॉट म्हणून जाहिर केले आहेत.
राज्यातील वाढती रुग्णसंख्या पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण राज्यात १४ एप्रिलला रात्री ८ वाजेपासून संचारबंदी लागू केली आहे. मात्र संचारबंदीतही रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या मोठी होती. कुठलेही योग्य कारण नसतांना संचारबंदीतही अनेक जण रस्त्यावर फिरतांना दिसून आले. त्यामुळे आता नाहक फिरणाऱ्यांवर चोप बसावा यासाठी महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने मोबाईल व्हॅनद्वारे कोरोना तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
शहरातील चौकाचौकांमध्ये बेजबाबदारांना पकडून मोबाईल व्हॅनमध्ये कोरोना तपासणी करण्यात येत आहे. मनपा आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने बेजबाबदार नागरिकांविरोधात हे पाऊल उचलण्यात आले आहे. मनपा प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांच्या आदेशानुसार व आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ नीता पाडळकर यांच्या नेतृत्वाखाली डॉ विशाल पट्टेकर, स्मार्ट सिटीचे सिद्धार्थ बनसोडे, आरोग्य कर्मचारी, लॅब टेक्निशियन हि मोहिम सक्षमपणे राबवित आहेत. आत्तापर्यंत १४६८ जणांना पकडून चाचणी करण्यात आली आहे. यात एकूण २७ व्यक्ती पॉझिटिव्ह आले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘उपमुख्यमंत्रीपद गेल्यावर नारळ पाणी विकणारा पण येणार नाही तुमच्याकडे’
- ‘एकच प्याला’साठी तोबा गर्दी; शेवटी बोलवावे लागले पोलीस
- ‘भारतीयांनो एकत्र राहा संघर्षाच्या या काळात फ्रान्स तुमच्यासोबत’
- लसीकरण उत्सव! डोस उपलब्ध होताच जालन्यात पुन्हा लसीकरणास सुरुवात
- मिशन झीरो डेथने घेतला वेग; केज तालुक्यात १२०० शिक्षकांची केली नियुक्ती


