🕒 1 min read
मुंबई : जगभरामध्ये हैदोस माजवणारा कोरोना व्हायरस भारतामध्ये दाखल झाला होताच परंतु तो कालपर्यंत तरी महाराष्ट्रामध्ये आढळला नव्हता, परंतु पुण्यामध्ये याचे दोन रुग्ण असल्याची बातमी आली आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घबराटीचे वातावरण पसरले.
कोरोनाचे हे दोन रुग्ण पुण्यामध्ये आढळल्यानंतर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लोकांना आवाहन केलं आहे, ते म्हणाले की, या दोघांवर त्यांच्या लक्षणांवर आधारित उपचार सुरू झाले आहेत. दोघांचीही प्रकृती स्थिर असून, या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, अफवा पसरवू नये आणि अफवांवर विश्वास देखील ठेवू नये.
याच पार्श्वभूमीवर भाजपाच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी करोनाचा फैलाव रोकण्यासाठी काय करता येईल यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये मुंडे म्हणाल्या, ‘करोनाचा फैलाव थांबवण्यासाठी केवळ मास्क पुरेशे नाही. तापमान वाढत नाही तोपर्यंत जिथे शक्य आहे तिथे लोकांना घरुन काम करायला सांगण्यास काय हरकत आहे,’ असं त्या म्हणाल्या.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या, ‘करोनाचा फैलाव थांबवण्यासाठी परीक्षेचा कालावधी वगळता शाळा-कॉलेजेसचा सुट्टी दिल्यास काय हरकत आहे. कमी लोकं बाहेर पडले तर कमी गोंधळ होईल आणि यंत्रणांना काम करणे सोप्प जाईल,’असं मत पंकजा मुंडे यांनी मांडले.
दरम्यान, आता पुणे प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. शिवाय, आरोग्य विभागामार्फत विशेष खबरदारी घेतली जात आहे. पुण्यात ज्या भागातील रुग्णांना करोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्या भागातील शाळांना रविवारपर्यंत सुट्टी देण्याचा निर्णय स्थानिक शाळा प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

