मुंबई- उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांनी उत्तर प्रदेशातही फिल्म सिटी उभारण्याची घोषणा केली होती. आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत नोएडात एक हजार हेक्टरवर फिल्म सिटी उभारण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी काम सुरू झाले असल्याची माहिती उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली. आग्रा, मधूरा, दिल्लीवरून ही फिल्म सिटी जवळ असल्याचेही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.
दरम्यान, आता फिल्म सिटीवरून राजकारणाला सुरूवात झाली आहे.राज्यातील सत्ताधाऱ्यांनी यावरून योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे. मुंबईत अनेक वर्षांपासून बॉलिवूड असण्यामागे येथील सर्वसमावेशकता, बहुसांस्कृतिकता, उत्तम कायदा व सुव्यवस्था असे अनेक कारणे आहेत. बाॅलीवूडला आपल्या राज्यात घेऊन जाण्यासाठी ज्यांना प्रयत्न करायचे आहेत, त्यांनी जरूर करावेत. फक्त अगोदर त्यासाठी पोषक वातावरण काय असते, ते समजून घ्यावे असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्र किंवा मुंबईत बॉलिवूडचं वास्तव्य आहे. अनेक कलाकार हे मुंबईत राहणारे आहेत. मुंबईत सवलती सोयी, फिल्मसिटी, लोकेशन यासारख्या विविध ठिकाणं आहेत. काही वेळा परदेशात जाऊनही शूटींग केली जाते. त्यामुळे कोणी मुद्दाम बॉलिवूड कुठे घेऊन जावू नये, असे मंत्री अशोक चव्हाण म्हणाले.तसेच सर्व सोयी-सुविधा असताना उत्तरप्रदेशात कोण जाईल? असा देखील सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशात फिल्म सिटी तयार करण्याची गोष्ट करत आहेत ही चांगलीच बाब आहे. परंतु हे समजून घ्या की, १०० वर्षांपासून मुंबईला मिळालेला बॉलिवूडचा दर्जा संपणार नाही. लोकं पूर्णपणे अन्य राज्यांमध्ये निघून जातील, पण बॉलिवूडचा दर्जा कोणी संपवू शकणार नाही, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे.
महत्वाच्या बातम्या
- जनतेच्या सर्व अपेक्षा ठाकरे सरकारने फोल ठरविल्या : प्रवीण दरेकर
- तैमूरच्या नखर्यांना तोड देतीये मराठमोळी स्टार किड ‘जिजा’
- मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त 9 कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य असणार
- लोकप्रिय मराठी अभिनेते अतुल परचुरे यांचा आज जन्मदिवस…
- उदयनराजेंचे ‘ते’ वक्तव्य धक्कादायक आणि आक्षेपार्ह आहे : सचिन सावंत


