🕒 1 min read
मुंबई : कोरोनाला रोखण्यासाठी सरकारकडून सर्वोत्तोपरी मेहनत घेतली जात आहे. रुग्णसंख्या दडवत असल्याच्या विरोधकांच्या आरोपात तथ्य नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री व शासकीय यंत्रणा २४ तास कार्यरत आहे, असे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘राज्य सरकारने चाचण्या वाढविल्या, परंतु अधिक प्रमाणात टेस्टिंग किटची गरज असून त्याची उपलब्धता केंद्र सरकारकडून झाली पाहिजे. सद्य:स्थितीत पीपीई कीट व मास्कची संख्या पुरेशा प्रमाणात आहेत,’ असं देशमुख म्हणाले.
याचप्रमाणे राज्यात सध्या खासगी व शासकीय अशा एकूण ४० लॅबमध्ये कोरोना चाचणी केली जाते. लवकरच त्यात वाढ करून ६० लॅब कार्यान्वित होतील, अशी माहिती देशमुख यांनी सोमवारी येथे दिली.
दरम्यान, राज्यातील सरकारी रुग्णालयांबरोबरच महापालिकांच्या रुग्णालयांमध्येही कोविड-१९ च्या चाचण्या, उपचार, जेवण या सर्व सुविधा मोफत देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतलेला आहे, अशी महत्त्वाची माहिती अमित देशमुख यांनी दिली.


