नांदेड : शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना उमेदवारी जाहीर केली आहे. देगलूर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने सुभाष साबणे यांना उमेदवारी दिली. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकातं पाटील यांच्या उपस्थितीत सुभाष साबणे यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. कार्यक्रमात बोलताना माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधला आहे.
विधानसभा गाजवणारा नेता म्हणून सुभाष साबणे यांची ओळख आहे. मला खात्री आहे की पंढरपूरनंतर देगलूरमध्ये क्रांती होणार. तीन पक्षाचे अलिबाबा आणि चाळीस चोर मतदान मागण्यासाठी येणार. त्यांनी पीक विम्याचे चार हजार कोटी रुपये वाटून खाल्ले. अतिवृष्टीनंतर आता आम्हाला हे काय देणार? मला खात्री आहे हे काही देणार नाहीत, अशा शब्दात सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केलीय.
महाविकास आघाडी सरकारमध्ये ज्यांच्याकडे बांधकाम खातं आहे त्यांच्याच जिल्ह्यात खड्डे आहेत. डांबर खाल्लं, मुरुम खाल्ला, असा घणाघात खोत यांनी चव्हाणांवर केलाय. शेतकऱ्यांना मदत द्या मग मतदान मागा. घोटभर दारू, वाटीभर रस्सा आणि पाच वर्षे बोंबलत बसा असं होऊ देऊ नका, असा सल्लाही खोतांनी मतदारांना दिलाय. एफआरपी दिला नाही. शेतकऱ्याकडे मुलाबाळांच्या शिक्षणासाठी पैसे नाहीत. बारा बलुतेदारांना मदत नाही. वीज कनेक्शन कट करायला या, या निवडणुकीत आम्ही तुम्हाला कट केल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराच खोतांनी दिलाय.
आम्ही बोलायला लागलो की कोरोनाचे नियम आठवतात. आम्ही घरात बसल्यावर काय माती खाणार का? आम्ही आम्ही घरात बसल्यावर तुम्ही माती खाणार आहात का? तुम्हाला जेसीबीद्वारे फुलं टाकलेली चालतात. आम्हाला मात्र सोशल डिस्टन्सिंग पाळायला सांगता. पोटनिवडणुकीत सुभाष साबणे यांना निवडून द्या. या निवडणुकीत चाबकाचा फटका काढून सगळा हिशेब घ्यायचा आहे, असंही खोत म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- योगी सरकारच्या भ्याड कृत्याचा निषेध, दडपशाहीने लोकांचा आवाज दाबता येणार नाही – जोशी
- कोरोनामुळे अनाथ झालेल्या ३०६ बालकांच्या खात्यात सुमारे १५ कोटी ३० लाख रुपये जमा
- ‘काळजी करू नका, तुम्हाला मदत मिळवून देणारच’, फडणवीसांची शेतकऱ्यांना ग्वाही
- ‘या’ नियमांचे पालन करणाऱ्या भाविकांनाच तुळजाभवानी मंदिरात प्रवेश दिला जाणार
- ‘रिक्त पदे भरण्याबाबत राज्य शासनाचे ‘तारीख पे तारीख’ धोरण उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या मुळावर येत आहे’


