मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ‘सामना’च्या संपादकीयमधून काँग्रेस पक्षात सुरू असलेल्या उलथापालथीवर भाष्य केलं आहे. काँग्रेस पक्षाने उसळी मारून उठावे, मैदानात उतरावे, नवचैतन्याची बहार राजकारणात आणावी अशी लोकभावना आहे. त्यासाठी काँग्रेसला आधी पूर्णवेळ अद्यक्ष हवाच. डोकेच नसेल तर शरीराचा काय फायदा? सिद्धू, अमरिंदर यांची मनधरणी करण्यात अर्थ नाही. पंजाबात काँग्रेस फोडून भाजपला विधानसभा गिळायची आहे, हा विनोदच म्हणावा लागेल. काँग्रेसशिवाय भाजपलाही जिंकता येत नाही आणि भाजपलाही काँग्रेसचे टॉनिक लागते. हे काँग्रेस नेतृत्वास कधी उमगणार? असं संजय राऊतांनी अग्रलेखात म्हंटल आहे.
सिद्धू यांच्या सततच्या कटकटीमुळे कॅप्टन अमरिंदर सिंग यांना दूर केले. आता सिद्धूही गेले. काँग्रेसच्या हाती काय उरले? तिकडे 79 वयाचे अमरिंदर हे दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना भेटले. अमरिंदर हे भाजपात जातील असे सांगितले जात होते पण त्या शक्यतेला खुद्द अमरिंदर यांनीच पूर्णविराम दिला आहे. मात्र, आपण काँग्रेसमध्येही राहणार नाही असेही त्यांनी म्हटलेय. तेव्हा ते स्वत:चा नवा पक्ष स्थापन करुन काँग्रेसला खड्ड्यात टाकतील असे दिसत असल्याचे राऊत म्हणाले आहेत.
कॅप्टन अमरिंदर सिंग यांना केंद्रीय कृषी मंत्रिपदाची ऑफर मिळाल्याची बोंब उठली होती. ज्यांचे वय 75 झाले. त्यांना सत्तेचे पद मिळणार नाही असे मोदींचे धोरण आहे. अमरिंदर सिंग यांचे वय 79 आहे. तेव्हा ते कसे काय होणार? पंजाबमधील गोंधळात भाजपचा हात आहे तसा काँग्रेस नेतृत्वातही गोंधळ आहे. काँग्रेस पक्षाला कायमस्वरूपी अध्यक्ष नाही आणि हंगामी स्वरूपाचे काम सुरू आहे. पंजाबात दलित मुख्यमंत्री करुन राहुल गांधी यांनी एक जोरदार पाऊल टाकले ते त्यांच्या प्रिय सिद्धूने अडकवले. काँग्रेस पक्षात मूळच्याच बोलघेवड्यांची कमी नसताना सिद्धूसारख्या उपऱ्या बोलघेवड्यांवर फाजील विश्वास टाकण्याची गरज नव्हती, असंही सामनाच्या अग्रलेखात संजय राऊत म्हणाले आहेत.
पंजाबातील गोंधळाचे पडसाद आता इतर राज्यांतही उमटू शकतात. पंजाबप्रमाणेच राजस्थानमध्येही नेतृत्वबदल होईल व मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनाही जावे लागेल अशी हवा निर्माण झाली होती. ती पंजाबमुळे थंड पडली. जुने वतनदार नव्या लोकांना संधी मिळू देत नाहीत. वाडा पडका झाला असला तरी त्यातील खिडक्या, दरवाजे, पंखे, पलंग, झुंबरांवर मालकी हक्क सांगून त्या वाडय़ातच ते पथारी पसरून बसले आहेत. राहुल गांधी वाडय़ाची डागडुजी करू इच्छितात. वाडय़ास रंगरंगोटी करू पाहतात, गळकी भोके बुजवू पाहतात. पण जुने लोक राहुल गांधींना ते करू देत नाहीत. राहुल गांधींना रोखण्यासाठी हे लोक आतून भाजपसारख्या पक्षाशी हातमिळवणी करतात हे आता पक्के झाले आहे. काँग्रेस बुडवायची सुपारी काँग्रेसच्याच लोकांनी घेतली हे मान्य, पण काँग्रेसला कायमस्वरूपी अध्यक्ष द्या, असं राऊत म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘भाजपालाही काँग्रेसचे टॉनिक लागते, पण हे काँग्रेस नेतृत्वास कधी उमगणार?’
- ‘इथेच पाप केलं तर इथेच पापं भोगावी लागतील’, मनसेचा राष्ट्रवादीला टोला
- वराती मागून घोडे नाचवून काहीच उपयोग नाही; दरेकरांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
- ‘अपमान झालाय, आता काँग्रेसमध्ये राहणारच नाही’, अमरिंदर सिंग यांची घोषणा
- ‘मुख्यमंत्री किती मिनिटांचा मराठवाडा दौरा करतात हे पाहावे लागेल’, मनसेचा टोला


