🕒 1 min read
सोलापूर : राज्यात सध्या कोरोनाने थैमान घातले आहे. सोलापूर जिल्ह्यात देखील रुग्णांची संख्या लक्षणीय आहे. ग्रामीण भागात देखील कोरोनाचा मोठा प्रसार झाल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. मोहोळ तालुक्यात देखील कोरोन रुग्ण वाढत असल्याचे दिसून येत आहे.
घाटणे (ता. मोहोळ) येथे देखील कोरोन रुग्णांची संख्या चांगलीच वाढली होती अशा परिस्थितीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करून गाव कोरोनामुक्त करण्यासाठी ग्रामस्थांना एकत्र करत ‘बी पॉझिटिव्ह, आपला गाव ठेवू कोरोना निगेटिव्ह’ ही मोहीम जिल्ह्यातील सर्वांत तरुण सरपंच ऋतुराज देशमुख यांनी हाती घेतली. याला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि बघता बघता गावात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत गेली आणि आज गाव कोरोनामुक्त झाले आहे.
याबाबत माहिती देताना ते म्हणाले, मोहोळ तालुक्यातील माझे घाटणे गाव अखेर कोरोनामुक्त झाले आहे. गेल्या वर्षभरात सुरक्षित राहिलेलं गाव एप्रिल महिन्यात कोरोनाच्या वक्रदृष्टीत आलं आणि मग सुरू झाली चिंता आणि खबरदारी!मार्चपर्यंत एकही कोरोना (Covid-19) रुग्ण गावात आढळून आला नव्हता. मात्र, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात गावात पहिला रुग्ण आढळला अन्तेथून दररोज कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढू लागला. अशा परिस्थितीमध्ये कोरोनाविरुद्ध लढा देणं गावचा प्रथम नागरिक या नात्याने आव्हानात्मक बाब होती.
पुढे बोलताना ते म्हणाले, शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात या महामारीचे निदान करून घ्यायला नागरिक धजावत नाहीत त्याच कारण देखील तसेच आहे. कोणी कोरोना बाधित झाला तर संपूर्ण गाव त्या बाधिताच्या घराला वाळीत टाकत असल्याचं दुर्दैवी चित्र आज देखील पाहायला मिळत आहे. अश्या वातावरणात लोकांमध्ये जागृती करणं ही सर्वात गरजेची गोष्ट होती आणि ती आम्ही केली व त्याचे परिणाम हळूहळू दिसून आले.
कोरोना प्रादुर्भाव कमी करून गाव कोरोनामुक्त करण्यासाठी ग्रामस्थांना एकत्र करत ‘बी पॉझिटिव्ह, आपला गाव ठेवू कोरोना निगेटिव्ह’ ही मोहीम जिल्ह्यातील सर्वांत तरुण सरपंच म्हणून पार पाडताना ग्रामस्थांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि बघता बघता गावात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत गेली अन् आज गाव कोरोनामुक्त झाले आहे याचा मनःस्वी आनंद वाटत आहे.
गाव कोरोनामुक्त करण्यासाठी अनेकांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले यामध्ये राजनजी मालक, आमदार यशवंत माने,बाळराजे पाटील साहेब, अजिंक्यराणा पाटील,गटविकास अधिकारी गणेश मोरे, आरोग्य अधिकारी पाथरूडकर, घाटणे गावचे ग्रामसेवक,सर्व ग्रामपंचायत सदस्य,आशा वर्कर व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले असं त्यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

