बारामती : कोरोना विषाणूच्या सावटात बारामती, भोर, इंदापूर, दौंड, पुरंदर तालुक्यात रविवारी (दि. 19) रात्रीच्या सुमारास वादळी पावसाच्या थैमानात वीजयंत्रणेला मोठा तडाखा बसला. यामध्ये सुमारे 95 पेक्षा अधिक उच्च व लघुदाबाचे वीजखांब जमीनदोस्त झाले. बारामती शहरासह 268 गावांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला होता. मात्र महावितरणचे अभियंते व जनमित्रांनी अविश्रांत दुरुस्ती काम करून आज सकाळपर्यंत 90 टक्के भागातील वीजपुरवठा सुरळीत केला तर उर्वरित भागांमध्ये सायंकाळी उशिरापर्यंत वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येत आहे.
रविवारी रात्री 7.30 ते 10 वाजेदरम्यान बारामती, भोर, इंदापूर, दौंड, पुरंदर तालुक्याच्या विविध भागात प्रचंड वादळासह मुसळधार पाऊस झाला. सुमारे दीड ते दोन तास वादळी पावसाचे थैमान सुरु होते. वीजयंत्रणेवर अनेक ठिकाणी झाडे कोसळली. झाडांच्या फांद्या पडल्या. त्यामुळे उच्च व लघुदाबाच्या 95 पेक्षा अधिक वीजखांब व तारा जमीनदोस्त झाले. 21 उपकेंद्रांमधून निघणाऱ्या 144 वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा खंडित झाल्याने या पाचही तालुक्यातील बारामती शहरासह सुमारे 268 गावांमधील सुमारे 1 लाख 39 हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महावितरणचे अभियंता व जनमित्र सध्या वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सर्वाधिक प्राधान्य देत आहेत. मात्र त्यातच अवकाळी वादळी पावसामुळे महावितरणला रविवारी रात्री अस्मानी संकटाला सामोरे जावे लागले. पावसाचा जोर ओसरताच रात्री वाहने, मोबाईल व बॅटरीच्या प्रकाशझोतात या पाचही तालुक्यामध्ये 46 अभियंते, 390 जनमित्र आणि कंत्राटदारांचे कर्मचारी एकाचवेळी वीजयंत्रणेच्या दुरुस्तीचे काम सुरु केले. काही ठिकाणी जनमित्रांनी स्वतःच वीजयंत्रणेवर पडलेल्या फांद्या काढणे, वीजतारांना अडकलेले पातळ पत्रे, बॅनर्स काढणे, वीजखांब उभारणे, वीजतारा ओढणे आदी सर्व कामे करून वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी योगदान दिले.
बारामती शहर व एमआयडीसीमधील 24 वीजवाहिन्यांची वीज खंडित झाल्याने रात्री दहाच्या सुमारास संपूर्ण शहर अंधारात गेले. मात्र अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रकाश देवकाते यांच्यासह 4 अभियंते व 58 जनमित्रांनी युद्धपातळीवर दुरुस्ती काम करून केवळ एक तासामध्ये बारामती शहराचा वीजपुरवठा पुर्ववत केला तर पहाटे 3 वाजेपर्यंत उर्वरित एमआयडीसी व लगतच्या भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. उर्वरित ठिकाणी महावितरणचे अभियंते व जनमित्रांनी रविवारी रात्रभर अविश्रांत काम करून 144 पैकी 129 वाहिन्यांचा वीजपुरवठा सकाळपर्यंत पर्यायी व्यवस्था किंवा दुरुस्ती कामातून टप्प्याटप्प्याने सुरु केला. काही वीजवाहिन्यांचे सलग 10 ते 15 वीजखांब कोसळल्याने ते बदलून सोमवारी (दि. 20) सायंकाळी उशिरापर्यंत वीजपुरवठा सुरळीत करण्यात येत आहे. रात्री दुरुस्तीसाठी गेलेल्या अनेक अभियंता व जनमित्रांना जेवणासाठी उसंत मिळू शकली नाही. रात्रभर अविश्रांत काम करून वीजपुरवठा सुरळीत झाल्यानंतर ते सकाळी उशिरा घरी परतले.
बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. सुनील पावडे हे वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आपात्कालिन नियोजन आखून देत आज सकाळपर्यंत लक्ष ठेऊन होते. तर बारामती मंडलचे अधीक्षक अभियंता श्री. चंद्रशेखर पाटील यांनी थेट दुरुस्तीच्या ठिकाणी वीजखांबासह इतर साहित्य, वाहने तसेच मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी रात्रभर समन्वयाचे काम केले. कार्यकारी अभियंता गणेश लटपटे (बारामती), अरविंद वनमोरे (सासवड), राजेंद्र येडके (केडगाव) यांच्यासह उपकार्यकारी अभियंता धनंजय गावडे (बारामती ग्रामीण), मोहन सुळ (वालचंदनगर), वैभव पाटील (दौंड), राजेंद्र कामठे (सासवड), बाळासाहेब फासगे (निरा), संतोष चव्हाण (भोर), सचिन म्हेत्रे (सोमेश्वर) आदींसह शाखा अभियंता, जनमित्र तसेच कंत्राटदारांच्या कर्मचाऱ्यांनी वादळी पावसाच्या तडाख्यातील वीजयंत्रणेच्या दुरुस्तीसाठी योगदान दिले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

