सोलापूर : निवडणूक निकालानंतर युती करण्यासाठी उशीर. अखेर युती तुटली अन् महाविकास आघाडी करण्यासाठी पुन्हा उशीर. आघाडी झाली तरी सत्तास्थापनेला उशीर. सत्तास्थापन झाली तरी शपथ घेतलेले मंत्री बिनखात्याचे राहिले. ऐन अधिवेशनाच्या तोंडावर तात्पुरते खातेवाटप करून विस्ताराकडे बोट दाखवले. आता मंत्रिमंडळ विस्तारही झाला. पण खातेवाटपावरून पुन्हा उशीर. असा उशिराने सुरू असलेल्या महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये नाराजी मात्र उशीर न करता सुरू झाली आहे. अशा नाराज आमदारांवर डोळा ठेवून टपून बसलेल्या भाजपच्या कमळाबाईला एक एक करून आमदार टिपून महाराष्ट्रात सत्तास्थापन करायची आहे. त्यासाठी आता महाराष्ट्रीय कमळाबाईला कर्नाटकी कळा सुटल्या आहेत.
मागच्या विधानसभा निवडणुकीत कर्नाटकामध्ये 224 पैकी 104 जागा मिळवून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. मात्र 80 जागा मिळवणार्या कॉंग्रेसने 37 जागा असणार्या जेडीएसला सोबत घेऊन सरकार स्थापन केले. सर्वात कमी जागा असणार्या जेडीएसचे नेते कुमारस्वामी मुख्यमंत्री बनले. या आघाडीमधील नाराज 11 आमदारांना आपल्या गळास लावून भाजपने ‘ऑपरेशन लोटस‘ यशस्वी केले. कॉंग्रेस-जेडीएसचे राज्य खालसा करून भाजपने कर्नाटकात बी.एस.येडीयुरप्पा यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदावर बसवले.
याच धर्तीवर 288 जागांपैकी 105 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष बनलेल्या भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी दोन्ही कॉंग्रेस आणि शिवसेनेने एकत्र येऊन महाविकास आघाडीचे सरकार बनवले आहे. मात्र तीन पायांचे सरकार बनवण्यासाठी आवश्यक असणारी आघाडी तयार होताना पहिल्यांदा उशीर लागला. त्यानंतर आघाडी झाली तरी सरकार स्थापन करण्यासाठी पुन्हा उशीर लागला. त्यातूनही मेळ घालत सरकार स्थापन केले, पण मुख्यमंत्र्यांसह तिन्ही पक्षाचे मिळून फक्त 6 आमदारांना शपथ दिली. त्यांनाही लवकर खाती दिली नाहीत. अधिवेशनाच्या तोंडावर एका एका मंत्र्याकडे आठ-आठ खात्यांचा पदभार देण्यात आला. त्यानंतर चर्चा सुरू झाली ती विस्ताराची.
दरम्यान, प्रत्येक टप्प्यावर उशीर आणि तिन्ही पक्षांचा ताळमेळ घालता घालता नेत्यांनी संपूर्ण राजकारणच उलथापालथा केले. आणि आता प्रत्येक टप्प्यागणीक तिन्ही पक्षांच्या आमदारांमध्ये नाराजी वाढत चालली आहे.
भाजपने कर्नाटकात ‘ऑपरेशन लोटस’ यशस्वी केले. त्याच धर्तीवर आता महाराष्ट्रातही ऑपरेशन करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. पण मुख्यमंत्र्यांनी ठाकरी शैलीत प्रत्युत्तर दिले आहे. इथे ‘ऑपरेशन लोटस’ला ‘ऑपरेशन धनुष्यबाण’शी ‘सामना’ करावा लागणार आहे. हा महाराष्ट्र आहे. कर्नाटक नाही, अशा शब्दात भाजपला खिजवले आहे.
मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्यामुळे शिवसेनेचे तब्बल 13 आमदार कमालीचे नाराज आहेत. त्याचवेळी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे एकूण 14 आमदार नाराज आहेत. हे 27 आमदार गळाला लावण्यासाठी भाजपवाले दबा धरून बसले आहेत. हे आमदार फुटले तर अपक्ष आणि अन्य मित्रपक्षांना सोबत घेऊन भाजपला सत्तेचा मार्ग सोपा होऊ शकतो. तीन पक्षांचे सरकार. तिन्ही पक्षांचे तीन विचार. तिन्ही पक्षात मंत्रिपदासाठी इच्छुकांची संख्या जास्त. ज्याला मंत्रिपद नाही मिळाले तो नाराज, अशी अवस्था झाली आहे. नाराजी दूर करायची आणि आपापले आमदार आपापल्या कळपात शाबूत ठेवण्याची कसरत करताना तिन्ही पक्षांची पाचावर धारण बसत आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

