🕒 1 min read
मुंबई:- राज्यातील तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघाच्या निकालातून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीला एकजुटीचे फळ मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. या पराभवानंतर चंद्रकांत पाटील म्हणाले की, “आम्ही एकटे लढलो म्हणून हरलो”. तसेच त्यांनी महाविकास आघाडीतील पक्षांना “हिंमत असेल तर एकटे लढा”, असे आव्हानही दिले. चंद्रकांतदादांच्या या वक्तव्याचा शिवसेनेने चांगलाच समाचार घेतला आहे. “आम्ही सर्वशक्तिमान आहोत, आम्ही एकटेच लढणार आणि जिंकणार ही खुमखुमी चंद्रकांत पाटलांची होती, ती चांगलीच जिरली आहे.” नागपूर व पुण्यातील भाजपचा पराभव ही बदललेल्या वादळी वाऱ्याची चाहूल आहे. असा टोला शिवसेनेने लगावला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मधून शिवसेनेने भाजपचा समाचार घेतला.
‘सामना’मधील अग्रलेखामध्ये म्हटले आहे की, महाविकास आघाडीचे सरकार तीनचाकी आहे, अशी टीका भाजपसारखे विरोधक वर्षभर करीत होते. यावर ‘‘सरकारला चाके चारच आहेत, चौथे चाक जनतेच्या विश्वासाचे आहे,’’ असा टोला मुख्यमंत्री ठाकरे यांनी हाणला होता. तो विश्वास स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या शिक्षक, पदवीधर निवडणुकांनी खरा ठरवला. विधान परिषदेच्या सहा जागांसाठी निवडणुका झाल्या. त्यातील पाच जागा महाविकास आघाडीने जिंकल्या. पदवीधर, शिक्षक मतदारसंघ म्हणजे भारतीय जनता पक्षाचीच मक्तेदारी होती. शिकले-सवरलेले, सुशिक्षित, सारासार विचार करणारे मतदार हे भाजपलाच मतदान करतात या भ्रमाचा भोपळा आता फुटला आहे. शिक्षक, पदवीधरांनी महाराष्ट्रात सर्वत्र महाविकास आघाडीलाच मतदान केले.
विधान परिषदेच्या सहापैकी सहा जागा जिंकू’’, अशा आरोळय़ा चंद्रकांत पाटील ठोकत होते. शरद पवार हे लोकनेते नाहीत असे बोलण्यापर्यंत त्यांची मजल गेली तेव्हा लोकांनीच त्यांना खाली पाडले. वर्षभरापूर्वी 105 आमदार येऊनही सत्ता गेली. तेव्हापासून महाराष्ट्र भाजपास सुतक लागले. कालच्या नागपूर-पुण्यातील पराभवाने आणखी एक सुतक लागले. एका वर्षात दोनदा सुतक लागणे हे हिंदू शास्त्रानुसार चांगले नाही. भाजपला काहीतरी तोड करावीच लागेल.
महत्वाच्या बातम्या
- तुकाराम मुंढेंना नडणाऱ्या संदीप जोशींचा नागपूरकरांनी केला दारुण पराभव
- आजचा विधानपरिषद निकाल म्हणजे रिक्षाने बुलेट ट्रेनला हरवले – अनिल परब
- मोठी बातमी : शेतकऱ्यांची ८ डिसेंबरला ‘भारत बंद’ची हाक!
- मुख्यमंत्री आज समृद्धी महामार्गाची पाहणी करण्यासाठी अमरावती, औरंगाबाद जिल्ह्यात
- ‘आम्ही सर्वशक्तिमान एकटेच लढणार व जिंकणार हि खुमखुमी त्यांचीच होती, ती चांगलीच जिरली’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
