मुंबई: सध्या संपूर्ण देशभरात भाजपची पीछेहाट होत असल्याचे चित्र आहे. नुकत्याच झालेल्या नगर पंचायत निवडणुकीत आलेल्या अपयशाने राज्यातील कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास खचू नये यासाठी आपणच नंबर एकचा पक्ष आहोत हे दाखवण्यासाठी प्रदेश भाजप खटाटोप करत आहे. कार्यकर्त्यांचे मनोबल कमी होऊ नये म्हणून अपयश लवपवण्याचा प्रयत्न होत असला तरी अपयशामागील कारणमिमांसा किमान भाजप नेतृत्वाने तरी समजून घायलाच हवी. असा खोचक टोला भाजप नेतृत्वाला लगावत आमदार रोहित पवार(Rohit Pawar) यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून भाजपला आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
यात त्यांनी म्हटले आहे, राज्यातील नगरपंचायत निवडणूकांमध्ये चारही पक्ष वेगवेगळे लढले. या पद्धतीने बघितल्यास २०१७ च्या तुलनेत २०२२ मध्ये महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाची भाजपावर सरशी झाल्याचे दिसते. २०१७ मध्ये राष्ट्रवादीच्या ताब्यात ११ नगरपंचायती होत्या आज ही संख्या २७ झालेली आहे. शिवसेनेकडे असलेल्या १४ नगरपंचायतीची संख्या आता १७ झालीय तर काँग्रेसनेही १२ नगरपंचायतीची संख्या २१ वर नेलीय. दुसरीकडं भाजपाला मात्र १४ नगर पंचायतीवरील सत्ता गमवावी लागली असून २०१७ मधे त्यांच्या ताब्यात असलेल्या ३६ नगरपंचायतींची संख्या आता २२ पर्यंत खाली आलेली आहे.
सदस्य संख्येच्या बाबतीत भाजपा एक नंबरला दिसत असला तरी राष्ट्रवादी आणि भाजपामध्ये म्हणावे तितके अंतर नाही. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे भाजप सर्वच ठिकाणी लढलेली होती. परंतु शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी प्रत्येक ठिकाणी लढलेले नाहीत. लढलेल्या जागा आणि जिंकलेल्या जागांचे प्रमाण बघितलं तर भाजपा तळाशी असलेला दिसेल. भाजपच्या भाषेत सांगायचे झाल्यास त्यांचा स्ट्राईक रेट २०% पेक्षा कमीच असेल. एकूणच ‘मविआ’च्या तिन्ही पक्षांनी कमावलंय तर भाजपने मात्र खूप काही गमावलंय.
महत्त्वाच्या बातम्या

