नागपूर : नागपूर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे विरोधातील सर्वपक्षिय सूर मंदावला असून भाजप एकाकी पडल्याचे चित्र आहे. गेल्या तीन दिवसांपासून नागपूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा सुरु आहे. पक्षाकडून कुठलीही परवानगी न घेता कांग्रेस नगरसेवक नितीन साठवणे यांनी सर्वसाधारण सभेत स्थगन प्रस्ताव मांडला. सतरंजीपूरा परिसरात कोरोना रुग्णांच्या विलगीकरण प्रक्रियेत अनावश्यक हस्तक्षेप केल्यामुळे साठवणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान हा गुन्हा मागे घ्यावा या मागणीसाठी त्यांनी स्थगन प्रस्ताव दिला. त्या प्रस्तावावर गेल्या तीन दिवसांपासून लांबलचक चर्चा सुरु आहे.
वादग्रस्त विधाने करण्यापेक्षा जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष द्या, शिवसेनेचा पडळकरांना सल्ला
स्थगन प्रस्तावावर चर्चेचा आजचा दुसरा दिवस होता. कांग्रेस नगरसेवक कमलेश चौधरी यांनी आपल्या भाषणात आयुक्त तुकाराम मुंढे यांची बाजू उचलून धरली. मुंढे यांच्यामुळेच नागपूरात कोरोनाचे समूह संक्रमण झाले नाही. त्यांच्या नेतृत्वातील महानगरपालिकेच्या टीमने अथक प्रयत्नातून नागपूरकरांना वाचविले असे ते म्हणाले. कोविडच्या आपातस्थितीत सर्वसाधारण सभेच्या नावाखाली आयुक्तांसह संपूर्ण यंत्रणेला वेठीस धरणे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले.आयुक्तांवर चिखलफेक करण्यासाठी सभेचा कालावधी वाढवला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. कांग्रेस नगरसेवक बंटी शेळके यांनी देखील आयुक्त मुंढे यांची पाठराखण केली. केवळ राजकारणासाठी मुंढेंना टार्गेट केले जात असल्याचे ते म्हणाले.
विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे व सत्तारुढ भाजपचे नेते संदीप जाधव यांनी एकत्र येऊन मुंढे यांच्याविरोधात पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रपरिषदेत मुंढे यांच्या विरोधात अविश्वास प्रस्तावाचा इशारा देण्यात आला. मनपाच्या सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने कांग्रेस नगरसेवक संजय महाकाळकर यांनी अविश्वास प्रस्ताव आणण्यासाठी महापौरांना पत्र दिले होते मात्र महापौरांनी हा प्रस्ताव नाकारत असल्याचे सभागृहात जाहीर केले.
धर्मांध शक्तींना विरोध करणारे शरद पवार हे एक उत्तुंग व्यक्तिमत्व आहे – चव्हाण
दरम्यान तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ नागपूरकरांनी सोशल मिडीयावरुन आंदोलन उभारले. जनरेट्यामुळे राजकीय पक्षांमध्येही दुफळी निर्माण झाल्याचे पहायला मिळते. युवक कांग्रेसने मुंढे यांच्या समर्थनार्थ आंदोलन केल्याने कांग्रेसची चांगलीच गोची झाली. विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे हे एकाकी पडले. आमदार व कांग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनीही मुंढेंशी उघड उघड संघर्षाची भूमिका घेतली आहे. मात्र प्रत्येक नगरसेवक वेगवेगळी भूमिका घेत असल्याने कांग्रेस पक्षाची नेमकी भूमिका कोणती हा प्रश्न निर्माण झाला होता. दरम्यान प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी स्थानिक कांग्रेस नेत्यांना कानपिचक्या दिल्याने मुंढे विरोधाचा स्वर मंदावला आहे. आता कांग्रेसच्या असहकार्याच्या भूमिकेमुळे मुंढे विरोधी फ्रंटवर भाजप राजकीयदृष्ट्या एकाकी पडल्याचे दिसते. भाजपमध्ये अनेक ज्येष्ठ नगरसेवक मुंढे विरोधी भूमिकेमुळे नाराज असल्याची चर्चा आहे.
आयुक्त मुंढे काय बोलणार
स्थगन प्रस्तावावरील चर्चेचे उत्तर देतांना तुकाराम मुंढे काय बोलणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे. वैयक्तिक टोकाची टीका झाल्यामुळे तुकाराम मुंढे यांनी सभात्याग केला होता. मात्र दुसर्यांदा पुन्हा ते सभागृहात परतले. यानंतर चर्चेला सुरुवात झाली. दोन दिवसांच्या चर्चेमध्ये कोविड उपाययोजना, विलगीकरण, केटीनगर हाॅस्पिटल, विकास कामांच्या थांबलेल्या फाईली या मुद्यांवरुन नगरसेवकांनी मुंढेंना लक्ष्य केले आहे. तेव्हा या सर्व आरोपांवर मुंढे काय उत्तर देतात याकडे सर्वांच्या नजरा असतील.
मनपाची सभा कि पावसाळी अधिवेशन
सर्वसाधारण सभेच्या नावाखाली सातत्याने चार दिवस सभागृह सुरु आहे. त्यामुळे हि सर्वसाधारण सभा आहे कि मनपाचे पावसाळी अधिवेशन असा सवाल आता नागपूरकर विचारु लागले आहेत. कोरोनाच्या संकटात आयुक्तांसह अधिकार्यांना वेठीस धरणे योग्य नसल्याची भावना अनेक नागपूरकरांनी सोशल मिडीयावरुन व्यक्त केली आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
