पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाइकांवर आयकर विभागाने छापा टाकला असून दोन दिवसांपासून कारवाई सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कारखाने, विविध संस्था, त्यांच्या तीन बहिणींच्या घरी आयकर विभागाने छापा टाकला. तसेच त्यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या मुंबईतील कार्यालयावरही छापा टाकला. ही कारवाई तिसऱ्या दिवशी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. यावर आता गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची प्रतिक्रिया आली आहे.
एका खासगी कार्यक्रमासाठी पुण्यात आले असता ते माध्यमांशी बोलत होते. आयकर विभागासह ‘एनसीबी’च्या (नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो) कारभारावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. फरार आरोपी आणि राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना एनसीबी साक्षीदार वा पंच कसे काय घेऊ शकते, ते कितपत बरोबर आहे. अशी प्रतिक्रिया त्यांनी मुंबईतील क्रुझ पार्टीच्या घटनेवर दिली. या क्रूझवरील रेव्ह पार्टीच्या कारवाईतून काही राजकीय नेत्यांच्या नातेवाईकांना वगळण्यात आले, तर अभिनेता शाहरूखानच्या मुलाला गोवण्यात आले. तसेच त्यात पंच म्हणून एनसीबीने भाजप पदाधिकारी मनिष भानूशाली आणि पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यातील फरारी सराईत गुन्हेगार के.पी. गोसावी या दोघांना घेतल्यावरुन त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
‘एखाद्याच्या घरी चौकशी करणे ठीक आहे. पण त्यांच्या सगळ्याच नातेवाइकांच्या घरी सुद्धा जाणे आणि त्रास देणे हे काही बरोबर नाही, अशी प्रतिक्रिया वळसे पाटील यांनी दिली. ‘यापूर्वीच्या काळात राजकारणामध्ये कधीही अशी परिस्थिती पाहिली नव्हती. केंद्र सरकार त्यांच्याकडे असलेल्या एजन्सींचा आणि सत्तेचा वापर हा राजकीय कारणासाठी करत आहे. यापूर्वीच्या काळात राजकारणामध्ये कधीही अशी परिस्थिती पाहिली नव्हती, असेही ते म्हणाले.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीकडून होत असलेल्या आरोपांचा समाचार घेतला आहे. ‘१०५० कोटी रुपयांची दलाली आयकर धाडीतून पुढे आली. बदल्या, टेंडर, मंत्री आणि अधिकारी असे सारे यात आहेत आणि सारे पुरावेही आहेत. या सार्या बाबी आयकर विभागाने काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद आहेत. आयकर खात्याच्या कारवाईला राजकीय रंग देऊ नये, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘शिवसेनेचं काँग्रेसमध्ये विलीनकरण करण्याचा विडाच राऊतांनी उचललेला दिसतोय’
- ‘एनसीबीच्या कारवाईवर शंका घेणेही चुकीचे!’ मलिकांच्या आरोपावर फडणवीसांची प्रतिक्रिया
- ‘प्रियंका गांधींच्या रुपाने इंदिराजींचे अस्तित्त्व पुन्हा दिसले!’ संजय राऊतांकडून ‘रोखठोक’ कौतूक
- ‘माफिया राज’ला सत्तेतील लोकांचा पाठिंबा; पंकजा मुंडेंचे मंत्री धनंजय मुंडेंवर टीकास्त्र
- मुलगा जेरबंद होताच केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्यावर राजीनाम्याचा दबाव


